सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आणि नंतर झालेल्या यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती !
१. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सेवा करतांना तहान-भूक विसरणे
‘११.५.२०२३ या दिवशी ब्रह्मोत्सवाच्या फेरीत सहभागी असणार्या साधिकांना मी नऊवारी साडी नेसवण्याची सेवा केली. ती सेवा करतांना देवाच्याच कृपेमुळे मी तहान-भूक विसरले होते. मैदानात गुरुदेवांच्या रथासमोर साधिका टाळनृत्य करत होत्या, तेव्हा मला ‘मीही त्यांच्या समवेत टाळनृत्य करत आहे’, असे वाटत होते आणि ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ।’ हा अभंग आठवत होता. त्या दिवशी मला तहान-भूकेची अजिबात जाणीव नव्हती.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवर केलेली कृपा पाहून भावजागृती होणे
सकाळपासूनच मला पुष्कळ आनंद जाणवत होता. रथामध्ये प्रत्यक्ष गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना बघून माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. ‘देवाने आपल्यावर किती कृपा केली’, असे वाटून माझे डोळे सारखे भरून येत होते. ते दृश्य पहातांना देवाला एकच प्रार्थना होत होती. ‘गुरुमाऊली, ‘मी काहीही करण्यास असमर्थ आहे. तूच माझ्या हृदयात अखंड वास कर.’
तुजविण नाही दुजा आधार ।
करण्या भवसागर हा पार ।।
३. १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी असलेल्या यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती
३ अ. १४.५.२०२३ या दिवशी आलेल्या अनुभूती
१. याग पहातांना मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सहस्रारचक्रामधून पिवळसर आणि तांबूस रंगांची वलये बाहेर पडतांना दिसत होती.
२. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यज्ञाच्या ठिकाणी ध्यानस्थ बसल्या आहेत’, असे मला वाटत होते.
३ आ. १५.५.२०२३ या दिवशी आलेल्या अनुभूती
१. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या यज्ञापाशी मांडी घालून बसल्या होत्या; परंतु मला ‘त्या लाल कमळात त्यांच्या डाव्या पायाची पालथी मांडी (उजव्या पायाच्या मांडीवर डाव्या पायाची मांडी ठेवणे) घालून बसल्या आहेत’, असे दिसत होते.
२. काही वेळाने मला यज्ञकुंड श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कमरेच्या उंचीचे दिसले.
३. मला यज्ञकुंडात आश्रमातील महाद्वाराकडे तोंड असलेली कासव आणि वाघ यांच्या केवळ तोंडाची आकृती दिसत होती.
‘केवळ आणि केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला या सर्व अनुभूती अनुभवता आल्या’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुचेता नाईक, फोंडा, गोवा, (१७.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |