पंढरपूरच्या तळघरात विठ्ठलाची प्राचीन मूर्ती सापडल्याचा अपप्रचार बंद करा ! – ह.भ.प. वाघ महाराज, पंढरपूर

‘श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिराच्या डागडुजीचे काम गेले अडीच महिने चालू आहे. हे काम चालू असतांना तेथील तळघरामध्ये काही मूर्ती सापडल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले. त्यात माध्यमांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसल्याचे दिसून आले आहे. या बातमीमध्ये एका व्यक्तीने माहिती देतांना सांगितले, ‘वर्ष १६७४ मध्ये अफझलखानाने पंढरपूरवर आक्रमण केले होते. त्यामुळे त्या काळात विठ्ठलमूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवलेल्या होत्या.’ त्या व्यक्तीचे हे विधान अभ्यासहीन होते. ते कसे ? ते या लेखाद्वारे येथे देत आहोत.

तळघरात सापडलेल्या विविध देवतांच्या मूर्ती

१. तळघरात सापडलेल्या मूर्तींविषयी माध्यमांकडून लोकांची दिशाभूल

वर्ष १६५९ मध्ये अफझलखान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्याच्या उद्देशाने सोलापूर आणि तुळजापूर मार्गे पंढरपूरला आला. त्या काळामध्ये बडवे समाजातील थोर पुरुष प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठ्ठलमूर्ती काढून पंढरपूर जवळच असणार्‍या देगाव येथील सूर्याजीराव घाडगे पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. त्यांनीही ती मूर्ती त्यांच्या घराच्या भुयारामध्ये, तसेच त्यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीच्या एका कोनाड्यामध्ये काही दिवस ठेवली. विहिरीला भरपूर पाणी असतांना तो कोनाडा पाण्याने पूर्ण भरून गेला होता. त्यामुळे पाणी न्यून झाल्यावर काही दिवस ती मूर्ती त्यांनी त्यांच्या घरातील भुयारात ठेवली. आधी भुयारात कि विहिरीत ? हा क्रम मागेपुढे होऊ शकतो; पण त्यांनीच मूर्ती सुरक्षित ठेवली होती, ही गोष्ट निश्चित आहे. शेवटी अफझलखानाचे आक्रमण संपल्यावर घाडगे पाटील यांनी ती मूर्ती प्रल्हाद महाराज बडवे यांना हस्तांतरित केली. या प्रक्रियेत तत्कालीन बडवे मंडळी, सूर्याजीराव घाडगे पाटील यांचे कुटुंबीय, तसेच बडवे कुटुंबीय यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. यासंदर्भातील कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी ‘वर्ष १६७४ मध्ये अफझलखानाच्या आक्रमणापासून मूर्ती वाचवण्यासाठी तळघरात ठेवली’, हे म्हणणे चुकीचे आहे.

याखेरीज हा काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा होता. त्यांच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी मातोश्री जिजाबाई इहलोक सोडून गेल्या आहेत. एकूण वर्ष १६५९ आणि वर्ष १६७४ हे दोन्ही कालखंड विविध अंगांनी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अभ्यास करून बोलले पाहिजे. विठ्ठल मंदिरात ‘विठ्ठलाच्या पुरातन मूर्ती सापडल्या’, असे सांगून आपण एक प्रकारे भाविकांच्या श्रद्धेला तडा देत आहोत.

२. तळघरात सापडलेल्या मूर्ती आणि पादुका यांचा इतिहास

विठ्ठल मंदिरामध्ये तपासणी करत असतांना मूर्ती सापडल्याची गोष्ट खरी आहे; पण त्या मूर्ती विठ्ठलाच्याच आहेत, हे सांगणे चुकीचे आहे. या घटनेत विष्णु, देवी आणि बालाजी अशा ३ मूर्ती मिळाल्या आहेत. याखेरीज पादुका आणि काही नाणी सापडलेली आहेत. असे असतांना ‘विठ्ठलाच्या मूर्ती मिळाल्या’, असे बेधडक सांगणे अयोग्य आहे. या पुरातन पादुकांनाही एक इतिहास आहे, तसेच मिळालेल्या नाण्यांनाही मूल्य आहे. आता मिळालेल्या मूर्ती आणि पादुका, तसेच सद्यःकाळातील विठ्ठल मंदिरातील असलेल्या बालाजी, देवी आणि विष्णु यांच्या मूर्ती, तसेच पादुका यांचा विचार करणे आवश्यक आहे.

अफझलखानाच्या आक्रमणाच्या काळात बडवे समाजातील थोर पुरुष प्रल्हाद महाराज बडवे आणि त्यांचे सहकारी देगाव येथील सूर्याजीराव घाडगे पाटील यांनी विठ्ठलमूर्ती संरक्षित केली होती, हे आपण पाहिले. अफझलखान मंदिरात आल्यावर त्याला गाभार्‍यात मुख्य मूर्ती दिसली नाही. त्यामुळे त्याने त्यांच्या माणसाकरवी हत्ती दरवाजातील हत्तीची मूर्ती फोडली आणि परिसरातील सुबक मूर्ती विद्रूप केल्या. या विद्रूप केलेल्या मूर्तींमध्ये बालाजीची मूर्ती, देवीची मूर्ती, मंदिरात प्रवेश करत असतांना जय-विजय यांच्या मूर्ती, तसेच उजव्या बाजूला  जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका म्हणून फलक लावला जातो, त्या तथाकथित पादुकाही विद्रूप करण्यात आल्या होत्या. पुढील काळामध्ये औरंगजेबाचे आक्रमण झाले, त्याही काळामध्ये  बडवे समाजातील तत्कालीन धुरीण लोकांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण करून वारकरी संप्रदायावर एक प्रकारे उपकारच केले आहेत. हे वारकरी सांप्रदायिक जातीवंत मनुष्य नाकारू शकत नाही.

असे असतांना ज्यांचा कोणताही अभ्यास नाही, इतिहासाचे ज्ञान नाही, अशी व्यक्ती मुखात येईल, त्याप्रमाणे बोलू वा वागू लागतो. आता मिळालेल्या मूर्तींची संगती लावणे आवश्यक आहे. औरंगजेब आणि अफझलखान यांचे आक्रमण संपल्यानंतर ज्या विद्रूप झालेल्या मूर्ती आहेत, त्यांची त्याच अवस्थेत पूजा करणे योग्य होणार नाही. हे लक्षात घेऊन  तत्कालीन मंडळींनी तरटी दरवाजाच्या बाजूला असलेल्या मंदिरात बालाजीची नवीन मूर्ती बसवली आणि तेथील मूळ मूर्ती तळघरात ठेवली, तसेच मंदिराच्या परिसरात गारेची मूर्ती असलेली लक्ष्मीमातेचे मंदिर आहे, त्या मंदिराच्या पाठीमागे आणि पश्चिम दारातून आत येत असतांना उजव्या बाजूला अष्टभुजादेवीचे मंदिर होते, तेथे अष्टभुजादेवीची मूर्ती होती. तीही विद्रूप करण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी दुसरी मूर्ती बसवून पूर्वीची मूर्ती तळघरामध्ये ठेवली.

३. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नाही, तर भानुदास महाराज पैठणकर यांच्या पादुका !

यासह मंदिरामध्ये गरुड खांबाच्या जवळून मुख्य गाभार्‍यात जात असतांना उजव्या बाजूला ज्या पादुका बसवलेल्या आहेत, त्या पादुका देहूच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नसून भानुदास महाराज पैठणकर यांच्या आहेत. वर्ष १५११ मध्ये भानुदास महाराज पैठणकर यांनी विजयनगरच्या साम्राज्यातून विजयनगरवरून विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरमध्ये आणून तिची स्थापना केली होती. पुढे वर्ष १५१३ मध्ये आषाढ शुक्ल चतुर्दशीला भानुदास महाराजांनी त्यांचे प्राण विठ्ठलचरणी समर्पित केले. त्यामुळे तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यावर पादुका ठेवण्यात आल्या होत्या. त्याही परधर्मियांनी विद्रूप केल्या होत्या. त्यानंतर वर्ष १८८५ ते ९२ या काळात सखाराम महाराज अमळनेरकर यांच्या गादीवर असलेल्या तुकाराम महाराज अमळनेरकर यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि जुन्या पादुका काढून नवीन पादुकांची स्थापना केली. त्या पादुका तुकाराम महाराज अमळनेरकर यांनी स्थापन केल्या होत्या; म्हणून तेथून पुढे त्यांना ‘तुकाराम महाराजांच्या पादुका’ हे नामाभिधान रूढ झाले. वास्तविक त्या पादुका भानुदास महाराज पैठणकर यांच्या आहेत. त्या दिवसानिमित्त आजपावेतो पैठणकर भानुदास महाराजांचे वंशज तेथे भजन, पूजन, आरती आणि नैवेद्य करतात. त्यामुळे निश्चितपणे ती समाधी भानुदास महाराजांची आहे. मग त्या ठिकाणच्या विद्रूप केलेल्या पादुकाही तळघरातच ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्रूप झालेल्या मूर्ती पालटण्याचा कार्यक्रम अडीचशे वर्षांच्या आतील असल्याने पुरातन नाही, तसेच सातार्‍याच्या गादीवर असतांना शाहू महाराजांनी तत्कालीन बडवे समाजातील मंडळीला सांगितले होते, ‘आक्रमण संपलेले आहे. त्यामुळे आता जीर्णोद्धार करण्यास हरकत नाही.’

४. माध्यमांनी वार्तांकन करतांना वारकरी संप्रदायाच्या भावना जपणे आवश्यक !

तळघरात सापडलेली मूर्ती या काळातील आहे कि त्या काळातील आहे ? ही चर्चाच निरर्थक आहे; कारण त्या २००-२५० वर्षांपूर्वी पालटलेल्या मूर्ती आहेत. त्या मूर्तीशी पांडुरंगाच्या मूर्तीचा काहीही संबंध नाही; कारण पांडुरंगाची मूर्ती अनेक नसून एकच आहे. माध्यमांनी लोकांची नाहक दिशाभूल करू नये. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या लोकांच्या भावनेला हात घालू नये. वारकरी सांप्रदायिक संतांनी ज्या मूर्तीचे वर्णन केलेले आहे, ती हीच मूर्ती आहे, अशी वारकरी संप्रदाय लोकांची जी श्रद्धा आहे, तिला ठेच पोचेल, असे वर्तन कुणीही करू नये, अशी माध्यमे आणि पुरातत्वविभागाचे काम करणारे लोक यांना हात जोडून विनंती आहे.’ (२.६.२०२४)

– ह.भ.प. बाबुराव महाराज वाघ, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.