जगातील मानवांच्या हिताचा जीवन जगण्याचा मार्ग दर्शवणारी महान भारतीय संस्कृती !

जगात भारतीय संस्कृती महान आहे; कारण तिने मानवाला जीवन जगण्यासाठी उत्तम आचार आणि विचार करण्याची पद्धत शिकवली. पूर्वीपासून भारतात अशी संस्कृती चालू होती. माझ्या महान देशाच्या महान संस्कृतीमुळे भव्यदिव्य, साहित्य-साहित्यिक, ग्रंथ-ग्रंथकर्ते, राष्ट्र आणि राष्ट्रभक्त दिले. या सार्‍यांना उत्पन्न करणार्‍या भारतीय संस्कृतीचा आज धावता परिचय करून घेऊया.

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

१. भारतीय संस्कृतीने दिलेला वारसा

१ अ. ज्ञान : ज्या माझ्या भारत देशाने जगाला ज्ञानाचा श्रीगणेशा दिला. वेदांसारखे दिव्य-ज्ञानमय ग्रंथ दिले. रामायण आणि महाभारत यांसारखे जीवन घडवणारे इतिहासात्मक काव्य ग्रंथ दिले. उपनिषदांतील जीवनाला ईश्वर तत्त्वाजवळ भिडवणारे तत्त्वज्ञान दिले. मनु-याज्ञवल्क्य यांच्यासारखे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र इत्यादींतील द्रष्टे दिले. व्यास, वाल्मीकि, भवभूति, कालिदास, बाणभट्ट यांच्यासारखे महाकवी दिले. शंकराचार्य, रामानुजाचार्य यांच्यासारखे प्रकांड पंडित दिले.

१ आ. संत : संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत कबीर आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे संत दिले.

१ इ. क्षात्रतेज : हरिश्चंद्र, हर्षवर्धन यांच्यासारखे राजे दिले. राणाप्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे श्रीमानयोगी दिले.

१ ई. स्त्रीरत्ने : सती सावित्री, अनसूया, जिजाबाई आणि अहिल्याबाई यांच्यासारखी स्त्री रत्ने दिली.

१ उ. देशभक्त : वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, मदनलाल धिग्रा, सुभाषचंद्र अन् सावरकर यांच्यासारखे प्रखर देशभक्त दिले.

२. ‘कुणाच्याही संपत्तीचा लोभ धरू नका’, हा या संस्कृतीचा मूलमंत्र आहे !

या जगातील सर्व काही ईश्वराच्या हातात आहे. त्याने तुम्हाला जे दिले आहे, त्याचा आनंद घ्या. ‘कुणाच्याही संपत्तीचा लोभ धरू नका’, हा या संस्कृतीचा मूलमंत्र आहे. हे सारे जग ईश्वराचे आहे; कारण ते त्याने निर्माण केले आहे. जे जे काही या जगात आहे, ते सारे त्याचे आहे. त्याचा उपभोग त्यागभावनेने केला पाहिजे. ‘आपण दुसर्‍याचे लुबाडून घेऊ नये’, या उदात्त विचारसरणीतून या देशाची संस्कृती उगम पावली आहे.

३. उदात्त विचारसरणी आचरणारा श्रीराम

राज्यावर जन्मसिद्ध हक्क असतांनासुद्धा राम पित्याच्या शब्दाचा आदर करतो. राज्यत्याग करून १४ वर्षे वनवासात जाणारा राम पृथ्वीच्या पाठीवर अन्य कोणत्या भूमीत जन्माला आला आहे काय ?

रामाच्या पाठोपाठ ‘जेथे राघव, तेथे सीता’ म्हणत वनात जाणारी सीता आणि बंधुप्रेमाने अकारण वनवास स्वीकारणारा लक्ष्मण, हे या संस्कृतीचे आदर्श जगाला नित्य आदर्शभूत ठरणारे नाहीत का ?

४. महाभारतात कौरवांचे पांडवांवर अनधिकृत आक्रमण आहे. श्रीकृष्ण पांडवांचा मार्गदर्शक आहे. ‘दुष्टांचा पाडाव केलाच पाहिजे. अखेरच्या क्षणापर्यंत लढा दिलाच पाहिजे’, हे महाभारत आम्हाला शिकवते.

५. विश्वातील क्षुद्र प्राणी आणि झाडेमाडे यांवरही प्रेम करायला शिकवणारी भारतीय संस्कृती !

आमच्या ग्रंथांनी आम्हाला केवढे महान विचार दिले आहेत. कालिदासाच्या शाकुंतलातील हा प्रसंग बघा !

पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु वा नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम् ।
आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्याः भवत्युत्सवः सेयं याति शकुन्तला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम् ।।

– अभिज्ञानशाकुन्तल, अंक ४, श्लोक ९

अर्थ : जी तुम्हाला पाणी पाजल्याविना आधी पाणी पिऊ शकत नसे, जी अलंकारप्रिय असूनही प्रेमामुळे तुमची कोवळी पाने तोडत नसे, तुमचा पहिला बहर (फुले येण्याची वेळ) हा जिचा उत्सव असे, अशी ही (शकुंतला) पतीगृही जात आहे. तुम्ही सर्वांनी तिला अनुज्ञा द्यावी.

हा कालिदासाच्या जगप्रसिद्ध शाकुंतल नाटकातील चौथ्या अंकातील हा एक महान श्लोक आहे. शकुंतला सासरी जायला निघाली आहे. ती रडते आहे आणि आश्रमवासी मंडळी रडत आहेत. माणसेच काय, आश्रमातील झाडेसुद्धा पाने हलवून आपले दुःख व्यक्त करत आहेत. तेव्हा त्या रडणार्‍या झाडांना आणि वेलींना उद्देशून मुनी म्हणत आहेत, ‘ही जी शकुंतला आज पतीकडे जाते आहे, तिने कधी तुम्हाला पाणी पाजल्याविना स्वतः जल प्राशन केले नाही. झाडे अन् वेली यांवर तिचे प्रेम आहे. तिला पाने फार आवडत असत. डोक्यात खोचायला, वेणीत माळायला; पण ती पाने तोडतांना तुम्हाला दुखेल; म्हणून तिने कधी पाने तोडली नाहीत. जेव्हा नवा बहर यायचा, म्हणजे नवी फुले यायची, तेव्हा तुमच्या नवप्रसूतीमुळे ती परमानंदात मग्न व्हायची. ती ‘ही’ शकुंतला आज पतीकडे जायला निघाली आहे. हे वृक्षांनो, हे वेलींनो, तिला अनुमती द्या !’

बघा, भारतीय संस्कृतीचे हे केवढे महान स्वरूप आहे. झाडा-माडांवर प्रेम केले जाते. पशु-पक्ष्यांवर प्रेम केले जाते. एका हरणाचे पाडसे शकुंतलेचा पदर ओढायला लागते. तेव्हा तिची सखी सांगते, ज्याला लहानपणीच मातृविरह झाला; पण तू स्वतःच्या बाळासारखे ज्याचे संगोपन केलेस, ते हे पाडसे तुझा पदर ओढत आहे. शकुंतलेने त्याला उचलून त्याचे मुके घेतले आणि त्याला अश्रूपूर्ण नजरेने निरोप दिला. विश्वातील क्षुद्र प्राणी आणि झाडेमाडे यांवरही प्रेम करायला आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीने शिकवले आहे.

६. ‘कविता म्हणजे कवीच्या उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आवेग !’, असे शिकवणारी भारतीय संस्कृती !

मानवी जीवनाला अशा प्रकारे उदात्ततेच्या शिखरावर नेणारे साहित्य आमच्याकडे अपरंपार आहे. नुसते काव्यच नव्हे, त्यात थोडे शास्त्रही आहे. काव्यशास्त्राचे मम्मटाचार्य काव्याची व्याख्या करतात. ‘वाक्यं रसात्मकं काव्यम् ।’ (साहित्यदर्पण, परिच्छेद १) म्हणजे ‘रसाळ वाक्य म्हणजे काव्य.’

याउलट प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थ यांनी ‘कविता म्हणजे उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आवेग !’ (Poetry is the spontenious overflow of powerful feelings.), अशी व्याख्या केली आहे. ‘तीव्र भावनावेगात काव्य होते’, असा आपला अनुभव आहे का ? आनंद होतो, तेव्हा हसू येते आणि दुःख होते. जेव्हा दुःखाचा आवेग सहनशक्ती ओलांडतो, तेव्हा त्याला ‘आक्रोश’ म्हणतात. त्याला कुणी काव्य म्हणत नाहीत. काव्यासाठी तीव्र भावनांचा अनावर आवेग लागतोच. या दोन गोष्टी जुळायच्या कशा ? उत्तर सोपे आहे. कवी वर्डस्वर्थ यांच्या व्याख्येत थोडा पालट करायला हवा. ‘कविता म्हणजे कवीच्या उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आवेग !’ (Poetry is the spontenious overflow of powerful feelings of poets.) कवी हा मूळ कवी असावा लागतो, तर त्याच्या भावनांना काव्याचा आकार येऊ शकतो. केवळ भावना नकोत, तर त्या ज्या शब्दांत गुंफायच्या ते शब्द रसवाही असावे लागतात. तेव्हा ते वाक्य काव्य बनते.

७. अनेक शास्त्रे सांगणारी भारतीय संस्कृती

समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वंशशास्त्र, सुप्रजाजननशास्त्र, आरोग्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, योगशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र इत्यादी विविध शास्त्रे, विविध विद्या आणि कला आमच्या देशात समृद्ध होत्या. जगातील मानवमात्राला आदर्शभूत मानवी जीवन या देशात सहस्रो वर्षे प्रत्यक्षात नांदले आहे. ग्रहगतीशास्त्र, ज्योतिषशास्त्रासारखे शास्त्रीय विषयांवर येथे शेकडो ग्रंथ झालेले आहेत. या संस्कृतीने जगातील मानवाच्या हिताचा जीवनमार्ग दर्शवला आहे आणि म्हणूनच ती महान आहे.

८. भारतीय संस्कृतीने शास्त्राच्या समवेत ६४ कला दिल्या आहेत !

भारतीय संस्कृतीने केवळ तत्त्वज्ञान, काव्य यांसारखी शास्त्रेच दिली असे नव्हे, तर नाट्य, नृत्य, स्थापत्य, शिल्प आदी ६४ कला दिल्या आहेत. आमच्या विद्वानांना अनेक विषयांत एवढी गती होती की, ढगांच्या केवळ निरीक्षणाने पावसाच्या संदर्भात त्यांना पूर्वसूचना देता येत होत्या. याबद्दल ग्रंथ आहे. अशा विविध भौतिक शास्त्रांवरही अनेक ग्रंथ होते.

९. भारताच्या महान संस्कृतीने इतके देऊनही दुर्दैवाने आजचा भारत स्वतःच्या महत्तम संस्कृतीपासून कुठेतरी भरकटत आहे.’

– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (क्लोजबरी चर्च, शार्लाेट (नॉर्थ कॅरोलायना), १.८.१९८०)