उतारवयातील एकटेपणा !

सध्या उतारवयात जोडीदार जीवनातून निघून गेल्यावर एकटे वाटू नये म्हणून दुसरे लग्न करण्याची प्रथा शहरी भागात पडू लागली आहे. अनेक प्रसारमाध्यमांतून याचे उदात्तीकरण केले जात आहे. काही घरात मुलेही परदेशात किंवा दुसर्‍या गावी असतात, त्यामुळे उतारवयात एकटे रहाणे कठीण होते. बर्‍याच जणांकडे पैसे असतात; परंतु विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात माणसे नसतात. या वयात आरोग्याच्या अनेक समस्याही असतात आणि सोबतीचीही आवश्यकता असते. अशा सर्व कारणांमुळे जोडीदाराची आवश्यकता भासते. काही उदाहरणांमध्ये हे लाभदायक ठरूही शकते; मात्र अशा प्रकारे उतारवयात दुसरे लग्न करण्यात अनेक प्रकारच्या समस्याही उद्भवू शकतात. पैसे, वारसा हक्क आदींसंदर्भात सुस्पष्टता नसेल किंवा स्वार्थ असेल, तर नवीन कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. याखेरीज वृद्ध माणसांना साहाय्यासाठी तरुण माणूस अधिक उपयुक्त असतो. दुसर्‍या वृद्ध माणसाला त्याला साहाय्य करायला मर्यादा येऊ शकतात. तरुण विवाहित जोडप्यांनाही एकमेकांशी जुळवून घेणे कठीण होते. वृद्ध व्यक्तींचे संस्कार हे प्रबळ झालेले असतात. त्यांना या वयात दुसर्‍याशी जुळवून घेणे अधिक कठीण वाटू शकते. त्यामुळे सोबत होण्याच्या मूळ उद्देशालाच तडा जाऊन ‘नवीन जोडीदार’ ही नवीन समस्याही उद्भवू शकते.

एकटेपणाची जाणीव निर्माण होणे, ही समस्या व्यवहारातील माणसाला निश्चितपणे उद्भवू शकते; परंतु ज्याला अध्यात्माचे मर्म कळले आहे, त्याला ‘ईश्वराखेरीज आपले जगात कुणी नाही’, हे त्याने जीवनात अनेकदा अनुभवलेले असते. त्यामुळे त्याचा सर्व भरवसा ईश्वरावर असतो. अशी व्यक्ती कुठल्या व्यक्तीमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतलेली नसल्याने ती समष्टीवर, म्हणजेच समाजावर अधिक भरभरून प्रेम करू शकते किंवा त्याच्याशी अधिक समरस होऊ शकते आणि तिला एकटेपणा वाटत नाही.

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धत असल्याने घरात व्यक्ती एकटी पडली, असे कधी होत नसे. यावरून एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्वही लक्षात येते. नुकतेच अमरावती जिल्ह्यामध्ये एका ८० वर्षांच्या वृद्ध आजोबांचे एका वृद्ध आजींशी त्यांच्या मुलाने लग्न लावून दिले आणि त्याचा ‘व्हिडिओ’ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. ग्रामीण भागातील ही घटना पाहिल्यावर हे लोण आता तिथेही पोचले आहे, हे लक्षात आले. या आजी दुसरीकडे तोंड फिरवून बसल्याने या ‘व्हिडिओ’वर गमतीशीर प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. हा गमतीचा भाग झाला, तरी वानप्रस्थ जीवन जगण्याच्या काळात अशा प्रकारे अंगात त्राण नसतांना पुनर्विवाह करणे, हे हास्यास्पद ठरते. त्यासाठी आयुष्याच्या आरंभापासूनच ईश्वरभक्तीचे संस्कार असतील, तर वृद्धापकाळी एकटेपणा जाणवणार नाही !

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.