पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्या संदर्भात अधिवक्त्या (सौ.) दुर्गा कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती
१. पू. सुमन नाईक यांना साधिकेच्या मनातील विचार कळणे आणि त्यांनी त्याची पूर्तता करणे
‘२२.१.२०२४ या दिवशी मला पू. सुमनमावशी (पू. सुमन नाईक, सनातनच्या ६२ व्या संत, वय ७५ वर्षे) यांच्या शेजारी बसून महाप्रसाद ग्रहण करण्याचे सद्भाग्य लाभले. मी ताटात लिंबाची फोड घेण्यास विसरले होते. थोड्या वेळाने माझ्या मनात विचार आला, ‘पुन्हा महाप्रसाद वाढून घेण्यासाठी उठल्यावर लिंबाची फोड घेऊया.’ त्याच वेळी पू. सुमनमावशी मला म्हणाल्या, ‘‘माझ्या ताटातील लिंबाची फोड तू घे.’’ त्यांनी मला लिंबाची फोड दिली. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘मला लिंबाची फोड हवी आहे,’ हा माझ्या मनातील विचार पू. सुमनमावशींना कळला आणि त्यांनी मला लिंबाची फोड दिली.’ नंतर त्यांनी त्यांच्या वाटीतील खीरही मला वाढली. संतांच्या हातून हे पदार्थ मिळाल्याने मला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञताही वाटली.
२. पू. सुमनमावशींच्या कृपेने साधिकेच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होणे
मी महाप्रसाद घेत असतांना मला एक साधिका दिसली. तिला पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल नकारात्मक विचार येत होते. त्याच वेळी पू. मावशींनी माझ्याकडे पाहिले आणि तो विचार तिथल्या तिथे नष्ट झाला. तो विचार कसा नाहीसा झाला, हे मला कळलेही नाही. तेव्हा ‘संतांचे सामर्थ्य किती अगाध आहे !’, हे मला अनुभवायला मिळाले.
या कलियुगात संतांची भेट होणे दुर्लभ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने आम्हा साधकांना संतांचा सहवास, त्यांचे प्रेम आणि त्यांची कृपा अनुभवायला मिळत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
हे गुरुमाऊली, आपल्या कृपेने ही अनुभूती आली. यासाठी मी आपल्या आणि पू. सुमनमावशी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२३.१.२०२४)
|