ब्रेड, बटर, खाद्यतेल आदी पदार्थांचे अतीसेवन आरोग्यास धोकादायक !
‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ने प्रसारित केली मार्गदर्शक तत्त्वे !
नवी देहली – ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ने (‘आय.सी.एम्.आर्.’ने) तिच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ब्रेड, बटर आणि खाद्यतेलासह काही खाद्यपदार्थांचा समावेश ‘प्रक्रिया केलेल्या पदार्थां’च्या (‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स’च्या) श्रेणीमध्ये करत ते पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले आहे.
१. परिषदेच्या म्हणण्यानुसार, ‘सी’ श्रेणीच्या खाद्यपदार्थांमध्ये ब्रेड, तृणधान्ये, केक, चिप्स, बिस्किटे, फ्राईज, जॅम, सॉस, मेयोनेझ, आईस्क्रीम, प्रोटीन पॅक पावडर, पीनट बटर, सोया चंक्स, टोफू (पनीरसारखा पदार्थ) यांसारख्या कारखान्यांमध्ये बनवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
२. परिषदेनेे चीज, लोणी, मांस, तृणधान्ये, बाजरी आणि सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पीठ, ऊर्जा निर्माण करणारे पेय (एनर्जी ड्रिंक), दूध, शीतपेय आणि ज्यूस यांचा पदार्थ अधिक काळ टिकण्यासाठी प्रक्रिया करण्यात येणार्या पदार्थांच्या ‘सी’ श्रेणीमध्ये समावेश केला आहे.
३. ‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’ हे आरोग्यदायी का नाही ?, याचे उत्तर असे आहे की, विविध धान्यांचे पीठ कारखान्यांत दळून ते भरपूर दिवस टिकावे, यासाठी त्यात कृत्रिम घटक आणि पदार्थ मिसळले जातात. त्याचप्रमाणे ताजी फळेसुद्धा खराब होऊ नये, यासाठी अनेक दिवस गोठवून ठेवली जातात. ही सर्व प्रक्रिया अन्नातून पोषक तत्त्वे काढून घेत. पदार्थाची चव, रंग आणि अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी कारखान्यांकडून त्यामध्ये आरोग्यासाठी घातक असलेले पदार्थ त्यात घालतात.
‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’मुळे होतात हे आजार !
‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’चे दीर्घकाळ सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते. या ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड’मध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते आणि फायबरसह आवश्यक पोषकतत्त्वे अत्यंत अल्प असतात. असे पदार्थ सामान्यत: एकदम स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. त्यास लोकांची पसंती असते. या पदार्थांमध्ये साखर आणि मीठ आधिक असतात, तर जीवनसत्त्वे आणि खनिजे अल्प असतात.