कर्करोगाच्या अतिशय खडतर यातना केवळ गुरुकृपेच्या बळावर सहन करणार्या पुणे येथील कै. (सौ.) गीता वसंत उगाणे (वय ५६ वर्षे)!
‘फेब्रुवारी २०१५ मध्ये माझी आई कै. (सौ.) गीता वसंत उगाणे हिला अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. वर्ष २०२१ मध्ये आईचा कर्करोग बळावला. २८.८.२०२२ (भाद्रपद शु. द्वितीया) या दिवशी रात्री १०.३० वाजता तिचे निधन झाले. आईचे पूर्वायुष्य, तिने केलेली साधना, तिला झालेला कर्करोग आणि तिच्या निधनानंतर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. देवाची ओढ
१ अ. लहानपणापासून संतांचे दर्शन होणे आणि संतांची सेवा करणे : माझ्या आजोबांना (आईचे वडील कै. परशुराम आवटे (बत्तीस
शिराळा) यांना) अध्यात्माची आवड असल्याने ते अनेक संतांचे दर्शन घ्यायला जात आणि जातांना ते माझ्या आईलाही समवेत घेऊन जात असत. आजोबा काही दिवस मिरजेला रहायला होते. तेव्हापासून आई आणि आजी मिरज येथील दत्त संप्रदायातील अण्णाबुवा महाराज यांची आणि त्यांच्या मठातील सेवा करत असत. आजोबा बत्तीस शिराळा येथे रहायला गेल्यावर तिथूनही त्या अधूनमधून मिरजेला येऊन मठात सेवा करत असत. बत्तीस शिराळा येथील गणपति मंदिरात ‘पूजेची सिद्धता करणे, आरती करणे’ इत्यादींमध्येही आई मनापासून सहभागी व्हायची.
१ आ. सत्संगाला जाणे : वर्ष १९९२ मध्ये आईचा विवाह होऊन ती डोंबिवली येथे रहायला आली. वर्ष १९९६ मध्ये आई सनातन संस्थेच्या वतीने डोंबिवली येथे होणार्या सनातनच्या सत्संगाला नियमित जाऊ लागली. तो सत्संग श्री. विजय लोटलीकर (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) घेत असत.
१ इ. सेवा आणि साधना करणे : आई ‘ग्रंथप्रदर्शनकक्ष लावणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, गुरुपौर्णिमेचा प्रचार करणे’, अशा सेवा करत असे. ती नामजप, प्रतिदिन घडलेले प्रसंग, चुका यांचा नियमित आढावा देत असे. तिने ६ मास ठाणे सेवाकेंद्रात सेवा केली. तेव्हा तिला ‘स्वच्छता करणे, नीटनेटकेपणा, नियोजन करणे’, अशा अनेक गोष्टी शिकता आल्या.
१ ई. नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना साधनेचे महत्त्व सांगणे : आई नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्ती यांना कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे अन् धार्मिक विधींचे महत्त्व सांगत असे. वर्ष २००७ मध्ये ती नातेवाइकांसह गोव्याला गेली होती. तेव्हा तिने नातेवाइकांना रामनाथी येथील सनातन संस्थेचा आश्रम दाखवला.
२. कर्करोग होणे आणि तो बळावल्यावर गुरुकृपेने स्थिर रहाणे
वर्ष २०१५ मध्ये आईला अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हा केलेल्या उपचारानंतर ती वर्ष २०२१ पर्यंत चांगली होती. जानेवारी २०२१ मध्ये आईचा कर्करोग पुन्हा बळावला. तिच्यावर लगेच उपचार चालू केले. तेव्हा देवाच्या कृपेने आई मनाने अतिशय स्थिर राहिली.
३. अन्ननलिकेला छिद्र पडल्यामुळे तोंडाने खाता न येणे; पण गुरुकृपेने तिने सर्व त्रास सहन करणे
ऑगस्ट २०२१ मध्ये उपचार चालू असतांना आईच्या अन्ननलिकेला मोठे छिद्र (Tracheoesophageal fistula) पडल्याने तिला तोंडाने काही खाणे किंवा थुंकी गिळणेही अशक्य झाले. आईला तोंडाने खाता येत नसल्यामुळे आम्ही तिला नळीद्वारे पातळ पदार्थ देत असू; मात्र पूर्ण पोषण न मिळाल्याने आईचे वजन घटले. केवळ गुरुकृपेमुळे ती हे सर्व त्रास सहन करू शकली.
४. रुग्णाईत असतांनाही व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे
आई रुग्णाईत असतांनाही ‘बगलामुखी स्तोत्र ऐकणे, श्री दुर्गादेवी आणि दत्त यांचा नामजप ऐकणे, स्वतःवरील अनिष्ट शक्तींचे आवरण काढणे, सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे’, असे प्रयत्न करत असे. शारीरिक वेदनांमुळे तिच्याकडून यात सातत्य रहात नसे; मात्र ती प्रतिदिन रात्री झोपतांना गुरुदेवांना प्रार्थना करून आणि आध्यात्मिक उपाय करूनच झोपत असे.
५. वर्ष २०२१ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संगणकीय प्रणालीद्वारे दाखवलेला जन्मोत्सव पहातांना आई पुष्कळ आनंदी होती.
६. २८.८.२०२२ या दिवशी आईचे निधन झाले.
७. एका संतांनी आईला पुनर्जन्म नसल्याचे सांगणे
आम्ही बर्याच वेळा डिग्रज (सांगली) येथील संत बाळू महाराज कुलकर्णी यांच्याकडे जात होतो. आईच्या अस्थीविसर्जनानंतर आम्ही संत बाळू महाराज यांचे दर्शन घ्यायला गेलो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांना पुढचा जन्म नाही.’’ ते ऐकल्यावर ‘ईश्वराने तिचे प्रारब्ध संपवून तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवले’, असे मला वाटले.
८. आई रुग्णाईत असतांना आणि तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे !
अ. माझ्या वडिलांनी (श्री. वसंत उगाणे, वय ७४ वर्षे) आईला शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. ते सतत तिच्या समवेत असायचे. त्यांनी आईला पुष्कळ आधार दिला.
आ. आईची सेवा करतांना आरंभी माझ्यातील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे माझ्या मनाची स्थिती नकारात्मक असायची. गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केल्याने त्यांनीच मला बळ देऊन माझ्याकडून आईची सेवा करून घेतली. आध्यात्मिक उपाय, प्रार्थना, कृतज्ञता यांमुळे मी आणि माझे वडील या कठीण प्रसंगात स्थिर राहू शकलो.
इ. आम्ही लिंगायत असल्याने आमच्यामध्ये मृत्यूनंतर दफन करण्याची पद्धत आहे; पण आईच्या इच्छेनुसार आम्ही तिचा अग्नीसंस्कार केला आणि १४ व्या दिवसापर्यंतचे सर्व विधी केले.
९. अनुभूती
अ. जानेवारी २०२१ मध्ये कोरोना महामारी चालू होती. आईसाठी आमची रुग्णालयात सारखी ये-जा चालू होती; पण घरात कोणालाच कोरानाची लागण झाली नाही.
आ. कोरोना काळात मला घरातूनच कार्यालयीन काम करावे लागत असल्याने आईची सेवा करता आली.
इ. आई रुग्णाईत असतांना प्रत्येक टप्प्यावर मला आणि आईला ‘प.पू. गुरुदेव सतत आमच्या समवेत आहेत’, याची जाणीव होत असे. शेवटच्या क्षणापर्यंत आई गुरुदेवांचा धावा करत होती.
ईश्वराने आईच्या सर्व इच्छा पूर्ण करून तिला मायेतून मुक्त केले. ‘प्रत्येक प्रसंगात ईश्वराला अपेक्षित आहे, तेच घडते’, हे गुरुकृपेने मला आईकडून शिकता आले.
‘हे गुरुदेवा, मला साधकआईच्या पोटी जन्म दिला आणि माझ्याकडून तिची सेवा करून घेतली’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अजिंक्य वसंत उगाणे (कै. (सौ.) गीता उगाणे यांचा मुलगा), पिंपरी, पुणे. (२२.५.२०२४)
|