तणावरहित जीवन जगण्यासाठी दोष निर्मूलन आवश्यक ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर – सध्या अनेक लोकांना तणावाला सामोरे जावे लागत आहे आणि त्याचे दुष्परिणामही कुटुंबांमध्ये दिसू लागले आहेत. आपल्या तणावाचे कारण आपण इतर व्यक्ती किंवा बाह्य परिस्थिती यांना ठरवत असतो; परंतु आपले सदोष व्यक्तिमत्त्व हेच ९० ते ९५ टक्के प्रमाणात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत असते; म्हणून दोष निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी व्यक्त केले. ते येथील श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढीच्या कर्मचार्यांसाठी आयोजित व्याख्यानात बोलत होते. या वेळी पतसंस्थेतील विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी असे ६४ जण उपस्थित होते.
श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी आणि संस्थेच्या ८ शाखेतील सर्व कर्मचार्यांसाठी २५ मे या दिवशी श्री चौंडेश्वरी मंगल कार्यालय, कन्ना चौक येथे ‘ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पतसंस्थेचे विश्वस्त श्री. म्याकल यांनी श्री. दत्तात्रय पिसे यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला. व्याख्यानानंतर अनेकांनी ‘विषय पुष्कळ आवडला’, असे सांगितले.
या वेळी श्री. पिसे पुढे म्हणाले की, चाकरी करतांना अनेक प्रसंगात ताण-तणाव निर्माण होतो. यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील मूळ कारण शोधून स्वयंसूचना घेणे, नामजप करणे असे उपाय करून त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येते.