राज्यातील लहान-मोठ्या २,९९७ धरणांत २२ टक्के पाणीसाठा शेष !

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत अल्प ८.७८ टक्के पाणीसाठा शेष

पुणे – राज्यामध्ये असलेल्या लहान-मोठ्या २ सहस्र ९९७ धरणांनी तळ गाठला आहे. सध्या ३१५ अब्ज घनफूट (टी.एम्.सी.) म्हणजे अवघा २२.०६ टक्के पाणीसाठा शेष राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत अल्प ८.७८ टक्के पाणीसाठा असून, त्या खालोखाल पुणे विभागात १५.६७ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस ३०.९४ टक्के पाणीसाठा होता.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ३१ मे अखेरीस सर्व धरणांत मिळून ३१५ टी.एम्.सी. इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ३८.१७ टक्के, अमरावती विभागात ३८.५६ टक्के, नाशिक विभागात २४.०६ टक्के, पुणे विभागात १५.६७ टक्के आणि कोकण विभागात ३४.२२ टक्के पाणीसाठा आहे. यांपैकी बहुतेक धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अनेक धरणांतून शेतीला किंवा पिण्यासाठी पाणी सोडण्यास कालव्यांची सुविधा नाही. त्यामुळे धरणांत पाणी असूनही त्याचा शेती किंवा पिण्यासाठी थेट वापर करता येत नाही. गुरांसाठीच्या पाण्याची सोयही अवेळी पावसामुळे झाली आहे.