सेवानिवृत्तीनंतर आता ‘हिंदुत्व’ हाच श्वास आणि ध्यास ! – राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
मुंबई – माझ्या आई-वडिलांनी सतत हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी मला प्रोत्साहित केले. वडिलांनी नेहमी इतरांना निरपेक्ष भावाने साहाय्य केले. त्यामुळे या दोघांचे संस्कार माझ्यात रुजले असून आता रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यावर मी कायम ‘हिंदुत्व हाच श्वास आणि ध्यास’ या ध्येयाने कार्यरत रहाणार आहे, असे प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार सोहळ्यात केले. (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपले आयुष्य हिंदुत्वासाठी वाहून घेणारे श्री. राजेंद्र वराडकर यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे ! – संपादक)
गेल्या ४० वर्षांपासून वराडकर हिंदुत्वाचे कार्य करत असून ३१ मे या दिवशी त्यांच्या सेवेला ३६ वर्षे पूर्ण होऊन ते भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाले. योगायोग म्हणजे याच दिवशी त्यांची वयाची ६० वर्षे पूर्ण होऊन त्यांनी ६१ व्या वर्षात पदार्पण केले. यामुळे स्मारकातील समस्त पदाधिकारी, सहकारी आणि कर्मचारी वृंदाने त्यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार, तसेच वाढदिवस सोहळाही साजरा केला.
या वेळी ‘हिंदुत्वाचे कार्य करतांना मी कधी श्रेयाची अपेक्षा बाळगली नाही. आता हृदयाच्या शस्त्रक्रियेमुळे थोडी शारीरिक मर्यादा असेल; मात्र उत्साहाने कार्य करणार’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा निवांत होण्याचा किंवा भटकंती करत मौजमजा करण्याचा असतो, असा बहुतेकांचा समज असतो. अशा चंगळवादी मनोवृत्तीत न रमता यातून निश्चितच बोध घेता येईल ! – संपादक)