व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मृणाल नीलेश जोशी (वय ११ वर्षे)!
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मृणाल नीलेश जोशी ही या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. सर्वांशी प्रेमाने बोलणे
‘मृणाल सर्वांशी प्रेमाने आणि हळू आवाजात बोलते. एखाद्या प्रसंगात तिला काही न पटल्यास ती शांत रहाण्याचा प्रयत्न करते. त्या वेळी ती उलट उत्तर देत नाही.
२. समाधानी वृत्ती
मृणालला खाऊ, कपडे, तसेच इतर मौजेच्या वस्तू यांची फार ओढ नाही. यासाठी ती कधीच हट्ट करत नाही. ती स्वतःहून कोणतीच वस्तू किंवा खाऊ मागत नाही. घरात जे आहे, ते ती आवडीने स्वीकारते.
३. समजूतदारपणा
वर्ष २०१५ मध्ये नेपाळ येथे भूकंप झाला होता. त्या वेळी मी (मृणालची आई (सौ. प्रीती नीलेश जोशी) ‘हिंदु जनजागृती समितीच्या साहाय्य पथका’च्या माध्यमातून तिथे सेवेसाठी गेले होते. तेव्हा मृणाल अडीच वर्षांची होती. मृणालला मी माझ्या बहिणीकडे नाशिकला ठेवले होते. तेथून निघत असतांना मी तिला सांगितले, ‘‘मी सेवेसाठी जात आहे. तू रडू नकोस.’’ मी सेवेला गेल्यावर एक मास माझे आणि मृणालचे एकदाही बोलणे झाले नव्हते. ‘माझा आवाज ऐकून ती रडेल’, अशी भीती मला वाटत होती; पण गुरूंच्या कृपेने ती माझ्या बहिणीकडे आनंदाने राहिली. तिला कुणी माझ्याबद्दल विचारल्यास ती सांगायची, ‘‘आई सेवेसाठी नेपाळला गेली आहे.’’
४. मृणाल नियमितपणे कपाळावर कुंकू लावून, हातात बांगड्या घालून आणि वेण्या घालून शाळेत जाते. तिला सात्त्विक वेशभूषा करायला आवडते.
५. नामजपादी उपाय गांभीर्याने करणे
ती शाळेत जाण्यापूर्वी नामजपादी उपाय करते आणि शाळेमध्ये प्रार्थना करते. एकदा तिला पुष्कळ ताप होता. त्या वेळीही तिने नामजपादी उपाय पूर्ण केले.
६. चुका स्वीकारून क्षमायाचना करणे
एकदा परीक्षेत ‘भूगोल’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत शिक्षकांनी ज्या प्रश्नांचा अभ्यास करायला सांगितला होता, त्यापेक्षा वेगळे प्रश्न आले होते. तिला सर्व प्रश्न सोडवता न आल्याने ती शाळा सुटल्यावर रडली आणि शिक्षकांविषयी प्रतिक्रियात्मक बोलली. त्या वेळी मी (आईने) तिला ‘या प्रसंगात तुझे काय चुकले ?’, याविषयी अभ्यास करायला सांगितले. नंतर तिने अभ्यास करून मला त्या प्रसंगाचे चिंतन सांगितले. त्याच रात्री तिने संबंधित शिक्षकांना संपर्क करून ‘माझ्या मनात परीक्षेतील प्रश्नांविषयी प्रतिक्रिया आल्या’, हे सांगितले आणि त्यांच्याकडे क्षमायाचना केली.
७. एका प्रसंगात तिची एक मैत्रीण शिक्षकांशी बाकावर बसून चढ्या आवाजात बोलत होती. मृणालने तिच्या मैत्रिणीच्या या चुकीची जाणीव तिला करून दिली.
८. सत्संगातील सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे
जेव्हा संतांचे मार्गदर्शन किंवा सत्संग असेल, तेव्हा तिला शक्य असेल, तेवढी सूत्रे ती लिहून घेण्याचा प्रयत्न करते. ती सत्संगात सहभागी होऊन बोलण्याचा प्रयत्न करते, तसेच सत्संगात सांगितलेली सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.
९. सूक्ष्मातून प.पू. गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्याशी बोलणे
‘मृणाल बर्याचदा काहीतरी पुटपुटत असते आणि स्मितहास्य करत असते’, असे एका साधिकेच्या अन् माझ्या (आईच्या) लक्षात आले. त्या वेळी तिला याविषयी विचारले असता तिने सांगितले, ‘‘मी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्याशी बोलत असते.’’
– श्री. नीलेश अच्युत जोशी आणि सौ. प्रीती नीलेश जोशी (कु. मृणाल हिचे वडील आणि आई), लांजा, जिल्हा रत्नागिरी. (२२.४.२०२४)
|