नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विदेशी भाषा निवडण्यास शिथिलता
गोव्यात नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची कार्यवाही
पणजी, २ जून (वार्ता.) – नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या योग्य कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाने इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना विदेशी भाषा निवडण्यास शिथिलता दिली आहे. इयत्ता सातवीमध्ये विदेशी भाषा निवडणार्या कोणत्याही विद्यार्थ्यांला गोवा माध्यमिक शिक्षण मंडळाने नववीच्या वर्गासाठी दिलेल्या भाषेसह विदेशी भाषा निवडण्याची अनुमती दिली जाईल.
गोवा सरकारने २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून नववीच्या वर्गासाठी माध्यमिक टप्प्यावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करतांना भाषा क्षेत्रांमध्ये, आर् १ इंग्रजी आहे, आर् २ कोकणी, मराठी किंवा हिंदी आणि आर् ३ ही मूळ भारतातील कोणतीही भाषा किंवा कोकणी, मराठी अन् हिंदी यांपैकी आर् २ मध्ये न निवडलेली कोणतीही भाषा यांचा पर्याय ठेवला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ७ वी मध्ये विदेशी भाषा निवडली आहे, त्यांच्यासाठी आर् ३ गटात गोवा शिक्षण मंडळाने सुचवलेल्यापैकी कोणत्याही एका भाषेसह फ्रेंच, पोर्तुगीज, जर्मन आणि अरबी यांपैकी कोणतीही एक विदेशी भाषा निवडण्याचा पर्याय शिक्षण खात्याने दिला आहे.