थोडक्यात…
छल्लेवाडा (गडचिरोली) येथे अंगणात झोपलेल्याला पेटवले !
गडचिरोली – २ जून या दिवशी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा या गावात घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री काहींनी पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. चरणदास गजानन चांदेकर (वय ४५ वर्षे) असे जळलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार चालू आहेत.
नक्षलग्रस्त भागातील आदिवासी तरुणांसाठी शिबिर !
गडचिरोली – जागृत संस्थेच्या वतीने नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कोलाम, कातकरी आणि माडिया या आदिम जमातीतील तरुणांमध्ये शैक्षणिक जागृती आणि नेतृत्व विकास यांना चालना देण्याच्या हेतूने ३ दिवसीय पहिले आदिम युवा नेतृत्व विकास शिबिर ‘जाणीव – २०२४’ मोरवा येथील छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय महाविद्यालयात नुकतेच घेण्यात आले. आदिवासींनी मुख्य प्रवाहात येऊन नक्षली बनू नये, या उद्देशाने असे उपक्रम राबवले जातात.
मुंबईतील भूमीगत मेट्रो लवकरच पूर्ण होणार !
मुंबई – येथील बहुचर्चित पहिली भूमीगत मेट्रो मार्गिका लवकरच पूर्ण होणार आहे. या मेट्रोची कार शेड आरे जंगलात उभी करण्यावरून बराच विरोध झाला होता, ते काम आता अंतिम होत आले आहे. आरे ते कफ परेड अशा उभ्या रहाणार्या ३३ किमी आणि २७ स्थानकांच्या ‘मेट्रो ३’ या भूमिगत मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असेल.
स्वदेशी बनावटीची मेट्रो ट्रेन पुण्यात !
पुणे – ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ची पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची मेट्रो ट्रेन २ जूनला पुण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील श्रीसिटी येथे निर्माण केली आहे. हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचे काम वेगाने चालू आहे. ‘अलस्टॉम’ आस्थापनाने ‘मेट्रो लाईन २’साठी ही ट्रेन बनवली आहे.
विदर्भात उष्माघाताने ९ जण दगावले !
नागपूर – विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा बसत आहेत; उष्माघाताने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नागपूर शहरातील ६ जणांचा समावेश आहे.
४ किंवा ५ जून या दिवशी मुंबईत पावसाचे आगमन होणार !
मुंबई – हवामान अभ्यासकांनी ४ किंवा ५ जून या दिवशी पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत मध्यम सरी पडतील. ६ ते १३ जूनपर्यंत चांगला पाऊस पडणे अपेक्षित आहे. १० जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १० जून या दिवशी तापमान ३१ अंशावर पोचेल.