सांगली शहरातील कॅफेचालकांवर कडक निर्बंध घालणार !

कंपार्टमेंट दिसल्यास कारवाई करणार !

‘हँग ऑन कॅफे’, सांगली

सांगली, २ जून (वार्ता.) – ‘कॅफेतील कंपार्टमेंटमध्ये गैरकृत्यांना चालना दिली जाते. त्यामुळे कॅफेत कंपार्टमेंट करू नये, तसेच कॅफेचालकांवर कडक निर्बंध घातले जाणार आहेत. शहरातील कॅफेचालकांची बैठक घेऊन त्यांना याविषयीच्या कडक सूचनाही दिल्या आहेत’, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी १ जून या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील १०० फूटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ‘हँग ऑन कॅफे’सह ३ अवैध कॅफेची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी पुढील कार्यवाहीला प्रारंभ केला.

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद !

पोलीस अधीक्षक संदीप घुगे

पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, ‘‘निवडणुकीपूर्वी शहरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे बंद आहेत. याविषयी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.’’

आता संबंधित कॅफेचालकाच्या विरोधात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कॅफेचालकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी या चालकांना कडक सूचना केल्या आहेत. संदीप घुगे म्हणाले की, शहरातील कॅफेत काही गैरप्रकार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांना तातडीने पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित कॅफेचालकांवर पोलिसांनीही कारवाई केली. प्रत्येक ठाणेदारांना कारवाईचे आदेशही दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ‘कॅफे शॉप’मधील बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत यावी, अशी यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. आतील दरवाजे पारदर्शक असावेत, जेणेकरून दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांच्या सहज दृष्टीस पडावेत. बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्पष्ट दिसेल, अशी प्रकाश योजना असावी, तसेच बंदिस्त कंपार्टमेंट करू नयेत. याशिवाय अन्वेषण अधिकार्‍यांनी पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच्या कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.