४ जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !
सातारा, २ जून (वार्ता.) – सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे. या परिसरामध्ये ६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी ४३ कॅमेरे मतदान यंत्रे ठेवलेल्या खोल्यांवर, तर उर्वरित १८ कॅमेरे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून महसूल विभागाच्या कर्मचार्यांद्वारे मतमोजणी प्रक्रियेनिमित्त रंगीत तालीम चालू आहे. मतमोजणी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मतमोजणी परिसरामध्ये ३३१ पोलीस कर्मचार्यांसह ५७ नायब तहसीलदार मतदान यंत्रांवर लक्ष ठेवून आहेत. हा खडा पहारा २४ घंटे चालू आहे. मतदान यंत्रे ठेवलेल्या खोल्यांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा पोलीस दलासह राज्य राखीव पोलीस दलाच्या २ स्वतंत्र तुकड्या आणि केंद्रीय पोलीस दलाची १ स्वतंत्र तुकडी, असा तिहेरी बंदोबस्त आळीपाळीने ठेवण्यात आला आहे. सध्या २ पोलीस निरीक्षक, २ साहाय्यक पोलीस निरीक्षक, २० पोलीस अंमलदार, तसेच राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ५० सैनिक पहारा देत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या दिवशी पोलिसांची कुमक वाढवण्यात येणार आहे. या दिवशी अनुमाने ३० पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेच्या ३० पोलीस कर्मचार्यांसह ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी मतमोजणी केंद्रावर बंदोबस्त पार पाडतील. या वेळी लाठी हातात असणारे पोलीसदल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सातारा पोलीसदलाने कळवले आहे.
सांगली येथे मतमोजणीच्या वेळी ६०० पोलिसांचा बंदोबस्त !
सांगली, २ जून (वार्ता.) – मतमोजणीच्या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षकांसह तब्बल ६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कालावधीत हुल्लडबाजी करणार्यांवर लक्ष्य ठेवले जाईल. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी चेतावणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
ते म्हणाले की मतदारांनी दिलेला कौल मतपेटीतून समोर येईल. त्यानंतर मिरवणूक काढण्यास अनुमती नाही. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. जिल्ह्यात प्रवेश करणार्या सीमांवर नाकाबंदी करून वाहनांची पडताळणी करण्यात आली. त्यात अनेकांवर कारवाईही करण्यात आली. यासह जिल्ह्यातील ३ सहस्र ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. सद्यःस्थितीत मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या शासकीय गोदाम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता मतमोजणीच्या दृष्टीने पोलीसयंत्रणा सज्ज आहे. निकालानंतर सूचनेनुसार मिरवणूक काढण्यास मनाई आहे.