सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी सतत अनुसंधान ठेवल्याने ‘ते चराचर व्यापून आहेत’ याची कु. स्मितल भुजले यांना आलेली प्रचीती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी सतत अनुसंधान ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे मला विविध अनुभूती येत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून काही कठीण प्रसंग घडत असल्यामुळे मी दिवस अन् रात्र मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी बोलत असते, तसेच त्यांना प्रार्थना करत असते. त्यामुळे ‘परम पूज्य सूक्ष्मातून सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटत रहाते. सद्गुरु, संत, साधक, निसर्ग, विचार आणि स्वप्न यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उत्तरे देतात. त्यामुळे ‘ते चराचर व्यापून आहेत’, याची प्रचीती येते.

कु. स्मितल भुजले

१. ‘गुरुदेवांप्रमाणे सद्गुरु आणि संत हेही चराचर व्यापून आहेत’, याची अनुभूती येणे

१ अ. श्री भवानीदेवीला केलेली प्रार्थना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यापर्यंत पोचल्याचे जाणवणे : वर्ष २०२१ मध्ये मला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्या वेळी मला पुष्कळ मानसिक आणि आध्यात्मिक त्रास झाले. ‘ते त्रास केवळ परम पूज्य समजू शकतात’, असे मला वाटत होते. परम पूज्यांशी प्रत्यक्ष बोलू शकत नसल्याने मला ते सर्व श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगायचे होते. त्यांना ते सर्व सांगण्यापूर्वी त्यांच्याकडे मला यासाठी बळ मागायचे होते. एके दिवशी रात्री मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीच्या मंदिरासमोर उभे राहून देवीला घडलेला प्रसंग आणि मनातील सर्व सांगितले. देवीला कळकळून विनंती केली, ‘तू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांमध्ये काही भेद नाही. तू आणि त्या एकच आहात, माझी हाक ऐक.’ त्या वेळी मला ‘माझ्या डाव्या बाजूला कुणीतरी उभे आहे आणि माझ्याकडे पहात आहे’, असे जाणवले. मी डाव्या बाजूला वळून पाहिले, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ माझ्याकडे बघत उभ्या होत्या. भ्रमणभाषवर त्यांच्याशी कुणीतरी बोलत होते, ते त्या शांतपणे ऐकत होत्या आणि माझ्याकडे पहात होत्या. मला वाटले, ‘मी देवीकडे बोलत असलेले त्यांना भ्रमणभाषवर ऐकू आले आहे’, असे त्यांना मला दाखवायचे होते.’ मी मनोमन त्यांना नमस्कार केला. त्या दिवशी ‘त्या म्हणजेच श्री भवानीदेवी आणि श्री दुर्गादेवी आहेत आणि त्यांनी माझी सर्व प्रार्थना ऐकली’, याची निश्चिती झाली. आपण प्रार्थना केल्यावर गुरुदेवांना ती ऐकू येते, तशीच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनाही आपली हाक ऐकू येते.

१ आ. पू. संदीप आळशी यांनी मनातील विचार जाणून त्यावर आध्यात्मिक दृष्टीकोन देणे : एकदा पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत) यांना चहा द्यायला मी त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी माझ्या मनात ‘काही साधिका माझ्याशी अशा का वागतात ?’, असा विचार येऊन मला वाईट वाटत होते. मी चहाचा थर्मास त्यांच्या पटलावर ठेवला आणि काहीच न बोलता निघाले. इतक्यात ते मला म्हणाले, ‘‘भाव असणार्‍या साधकांचे बरे असते ना ? कुणी त्यांच्याशी कसेही वागले, कसेही बोलले, तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. ते त्यांच्या भावस्थितीतच असतात.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘पूज्य दादांनी माझा मनातील विचारांसाठी उपाय सांगितला की, भावस्थितीत (देवाच्या अनुसंधानात) राहिलो की, इतर आपल्याशी कसे वागतात, बोलतात याकडे लक्ष जात नाही. केवळ देव आणि मी असाच विचार मनात असतो.’ या प्रसंगावरून मला वाटले, ‘पूज्य संदीपदादा यांना गुरुदेवांप्रमाणे सर्वकाही कळते.’

२. झोपेत अनिष्ट शक्ती त्रास देत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने रक्षण होणे

आठ ते दहा मासांपूर्वी घरी दुपारच्या वेळी झोपलेले असतांना ‘एक बाई मला झोपेत त्रास देत आहे’, असे मला जाणवले. तिने मला घट्ट धरून ठेवले होते आणि ती माझ्या कानात फुंकर मारून मला गुंगी आणत होती. त्यामुळे मला जाग येत नव्हती. मी कितीही प्रयत्न केला, तरी मला बोलता किंवा डोळे उघडता येत नव्हते. ‘तिने मला घट्ट बांधून ठेवले आहे’, हे मला झोपेत जाणवत होते. तेव्हा झोपेत माझ्या तोंडातून आपोआप ‘सच्चिदानंद’ असा शब्द बाहेर पडला आणि ती बाई त्याच क्षणी अदृश्य झाली अन् मला जाग आली. त्यानंतरही काही दिवसांनी ती आली तेव्हाही झोपेत माझ्या तोंडातून ‘जय गुरुदेव’ असे शब्द आपोआप मोठ्याने बाहेर पडले आणि ती बाई गेली. हे सर्व केवळ गुरुदेवांनाच शक्य आहे. झोपेतही ते आपले रक्षण करतात आणि त्यांच्या नावात इतके सामर्थ्य आहे की, वाईट शक्ती पळून जातात.

३. निसर्गाच्या माध्यमातून आणि विचार देऊन गुरु समवेत असल्याची अनुभूती देणे

अ. आमच्या घरी आम्ही काही फुलझाडे लावली आहेत. दोन वर्षांपासून झाडांना पुष्कळ अल्प प्रमाणात फुले येत आहेत. एकदा चमेलीच्या झाडाला पुष्कळ प्रमाणात फुले आली. एवढी फुले आले की, मी त्यांचा पहिल्यांदाच एक गजरा केला. त्या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘‘ही पांढरी फुले केसांत माळावी.’’

आ. त्याच दिवशी माझ्या मनात सतत विचार येत होते, ‘आज चांगला इस्त्रीचा पोशाख घाल आणि छान कानातलेही घाल.’ हे विचार तीव्रतेने येत असल्याने ‘देवाची इच्छा असेल’, असे समजून मी तसेच केले. त्यानंतर आश्रमात गेल्यावर मला आणि आईला गुरुदेवांचा सत्संग मिळणार आहे, असे समजले. तेव्हा मला ‘हे विचार का येत होते’, याची जाणीव झाली.

इ. निसर्गाच्या माध्यमातून परम पूज्यांनी आम्हाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. त्या दिवशी ‘चांगले कपडे घालून सत्संगाला गेले नाही’, याचे नंतर वाईट वाटले असते. त्यामुळे परम पूज्यांनी आधीच विचार देऊन ते करून घेतले. यावरून मला वाटले, ‘आपल्याला त्यांना भेटण्याची ओढ असतेच; पण त्यांनाच साधकांना भेटण्याची किती ओढ असेल की, ते त्यांना भेटण्यापूर्वीच्या सर्व प्रवासातही त्यांच्या समवेत असतात.

मला एका साधिकेने सांगितले होते, ‘ही सर्व सृष्टी देव निर्माण करतो; कारण त्याला जीव देवापासून उत्पन्न होण्यापासून ते तो जीव परत देवात विलीन होईपर्यंतचा (मोक्षप्राप्तीपर्यंतचा) आनंद अनुभवायचा असतो. इतके देवाचे त्या जिवावर प्रेम असते.’ हेच प्रेम परम पूज्य त्यांच्या साधकांवर करत आहेत आणि मोक्ष मिळेपर्यंत करत रहातील.

‘परम पूज्य, तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड सांभाळणारे साक्षात् परमेश्वर, आदिपुरुष आहात. माझी श्रद्धा आणि भक्ती दृढ होण्यासाठी तुम्हीच मला आशीर्वाद द्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’

– कु. स्मितल भुजले, फोंडा, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक