Indian Weapons : तुमची शस्त्रे कुठे पोचत आहेत ?, यावर लक्ष ठेवा !
संरक्षण मंत्रालयाची शस्त्रनिर्मिती करणार्या आस्थापनांना चेतावणी
नवी देहली – संरक्षण मंत्रालयाने शस्त्रास्त्र निर्मिती करणार्या खासगी आस्थापनांना चेतावणी देत त्यांची शस्त्रे कुठे पोचत आहेत ?, यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
१. ‘युरेशियन टाइम्स’च्या वृत्तानुसार या वर्षाच्या आरंभी काही प्रसारमाध्यमांनी ‘भारतात बनवलेले १५५ एम्.एम्. आर्टिलरी शेल्स हे शस्त्र युक्रेनमध्ये वापरले जात आहेत’, असा दावा केला होता. या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत ‘भारताकडून युक्रेनला कोणत्याही प्रकारची शस्त्रे पाठवण्यात आलेली नाहीत’, असे सांगितले होते. या घटनेनंतरच आता संरक्षण मंत्रालयाने शस्त्रनिर्मिती करणार्या खासगी आस्थापनांना वरील चेतावणी दिली आहे. मंत्रालयाने या आस्थापनांना ‘एंड यूजर सर्टिफिकेशन’च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. याद्वारे भारताने निर्यात केलेली शस्त्रेे शेवटी कुठे पोचतात ? याची निश्चिती केली जाते. सध्या युक्रेन, तुर्कीये, चीन आणि पाकिस्तान यांना शस्त्रास्त्रे विकणार्या भारतीय आस्थापनांवर निर्बंध आहेत.
२. काही दिवसांपूर्वी स्पेनने दावा केला होता की, भारतातून इस्रायलकडे स्फोटके घेऊन जाणार्या नौकेला त्याच्या बंदरावर थांबण्यास अनुमती नाकारली होती. डेन्मार्कचा राष्ट्रीय ध्वज लावलेली ही नौका चेन्नईहून इस्रायलमधील हैफा बंदराकडे जात होती. त्यात शस्त्रे होती; मात्र ही शस्त्रे भारताची आहेत कि अन्य कोणत्या देशाची ?, हे सांगण्यात आले नाही. याविषयी परराष्ट्र मंत्रालयाकडे विचारणा केली असता प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते.
३. गेल्या २ वर्षांत म्यानमारच्या सैन्याला भारतीय आस्थापनांकडून ४२० कोटी रुपयांची शस्त्रेे आणि संबंधित वस्तू मिळाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांनी केला होता. सैन्याने लोकांविरुद्ध हिंसाचार करण्यासाठी या शस्त्रास्त्रांचा वापर केल्याचा पुरावा असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.