Protest in Israel : इस्रायलमध्ये १ लाखाहून अधिक लोकांची निदर्शने !
ओलिसांच्या सुटकेची, तसेच नेतान्याहू यांना पदावरून हटवण्याची मागणी
तेल अविव – शहरात लोकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. या वेळी लोकांनी ‘सरकारने हमासशी ओलिसांच्या सुटकेसंदर्भात करार करावा’, ‘पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पदावरून हकालपट्टी करावी’ आणि ‘देशात लवकर निवडणुका घ्याव्यात’, अशी मागणी केली. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर आक्रमण झाल्याच्या घटनेनंतर हे इस्रायलमधील सर्वांत मोठे आंदोलन होते. या आंदोलनामध्ये १ लाख २० सहस्र लोक सहभागी झाले होते. आंदोलकांनी डेमोक्रसी स्क्वेअर, बिगिन रोड आणि कप्लन स्ट्रीट येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. आंदोलकांनी ‘ओलिसांना परत आणलेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या.
कतार, अमेरिका आणि इजिप्त या देशांनी सादर केले संयुक्त निवेदन !
कतार, अमेरिका आणि इजिप्त या देशांनी एका संयुक्त निवेदन सादर केले आहे. यात इस्रायल आणि हमास यांना प्रस्तावित युद्धविराम आणि ओलीस सुटका करार स्वीकारण्याचे आवाहन केले. निवेदनात म्हटले आहे की, या करारामुळे गाझातील दीर्घकाळ पीडित लोक, तसेच ओलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्वरित साहाय्य मिळेल.