मनुस्मृतीमध्ये स्त्रीचा सन्मान करायलाच सांगितलेले असणे

मनूच्या ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति ।’ या वचनावरून सध्या स्त्रीमुक्तीवाले आणि तथाकथित पुरोगामी गदारोळ उठवतात; पण संस्कृत सुभाषितकार स्त्रीविषयी किती आदराने बोलतात, हे पाहिल्यावर सध्याचा गदारोळ चुकीच्या समजुतीतून निर्माण झाला आहे, हे कळेल. मनूचे प्रसिद्ध वचन संदर्भ सोडून उद्धृत करतात आणि मनूला ते स्त्रीद्वेष्टा ठरवतात. मूळ वचन असे,

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमहर्ति ॥

– मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३

अर्थ : लहानपणी पिता, तारुण्यात पती आणि म्हातारपणी पुत्र स्त्रीचे रक्षण करत असल्याने तिला संरक्षणाविषयी स्वातंत्र्याची आवश्यकता नाही.

‘स्त्री स्वातंत्र्यास योग्य नाही’, याचा अर्थ ‘त्या स्वातंत्र्यास पात्र नाही’, असा केला जातो; पण याचा तो अर्थ चुकीचा आहे. इथे ‘स्त्रीला एकाकी स्वतंत्र न ठेवता पिता, बंधू, पती आणि पुत्र यांच्यापैकी कुणाच्या तरी संरक्षणाखाली ठेवावे’, असे सांगितले आहे. असा समाज कितीही पुढारला, तरी स्त्रीला एकटे रहाणे शक्य आहे का ? तिचे रक्षण करणे आवश्यक आहे; म्हणून मनूचे वचन सार्थ आणि योग्य आहे. मनूला स्त्रियांविषयी किती आदर आहे, हे दुसर्‍या श्लोकावरून दिसून अधिक स्पष्ट होईल.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥

– मनुस्मृति अध्याय ३, श्लोक ५६

अर्थ : जेथे स्त्रीचे (सर्वार्थाने) पूजन होते. तेथेच देवतागण संतोषाने आणि प्रसन्नतेने रहातात. ज्या घरात स्त्रियांची अवहेलना होते, तेथील सर्व धर्मकृत्ये निष्फळ होतात.

स्त्रियांची पूजा करणारा मनु ज्या वेळी ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति’, असे म्हणतो, त्या वेळी त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे.