तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही गुर्वाज्ञापालन करून सेवा करतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा !
१९ मे २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘चैतन्य वाहिनी’च्या सेवेचे स्वरूप आणि ती सेवा करतांना झालेले त्रास’ इत्यादी सूत्रे पाहिली. आता या भागात या सेवा करतांना ‘गुरुदेवांची अपार कृपा कशी अनुभवली ?’, ते येथे दिले आहे.
(भाग २)
मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/795059.html
५. देवद आश्रमातील साधकांनी पंचकर्मातील ‘स्नेहन’, ‘बस्ती देणे’, हे उपचार शिकून आश्रमातच ते उपचार केल्यामुळे उपचारांसाठी बाहेर जावे न लागणे
‘आश्रमातील साधकांनी पंचकर्मातील स्नेहन (टीप १), ‘बस्ती’ देणे (टीप २) इत्यादी सर्व उपचार प्रक्रिया शिकून घेतल्यामुळे मला या उपचारांसाठी आश्रमातून बाहेर जावे लागले नाही. हे सर्व उपचार मला माझ्या खोलीतच मिळत होते. साधक प्रतिदिन सकाळी माझ्या शरिराला स्नेहन करायचे आणि अधूनमधून माझ्यावर ‘बस्ती’चे उपचार करायचे. यातून ‘गुरुदेव माझी किती काळजी घेत होते’, हे माझ्या लक्षात आले.
(टीप १ – औषधी तेल कोमट करून हळूवारपणे चोळून ते तेल शरिरात जिरवणे)
(टीप २ – शरिरातील वाढलेला वात न्यून करण्यासाठी औषधी तेल किंवा काढा गुदद्वारातून देणे)
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘चैतन्य वाहिनी’च्या सेवेत कुठल्याही कारणाने खंड न पडणे
मला एवढा शारीरिक त्रास होत असूनही ‘चैतन्य वाहिनी’च्या सेवेत कुठल्याही कारणामुळे कधीही खंड पडला नाही. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच शक्य झाले. केवळ गणेशोत्सव आणि दिवाळी या २ सणांच्या वेळी ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा बंद असे.
७. संतांची अनुभवलेली कृपा !
७ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी स्वतः केलेले नामजपादी उपाय आणि मर्दन ! : मी देवद आश्रमात आल्यापासून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी स्वतः जवळजवळ ६ मास माझ्यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय आणि मर्दन केले. त्यांनी माझ्यासाठी वेळोवेळी मंत्रजप देऊन माझे दुखणे सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रीतीला माझ्याकडे उपमाच नाही. त्यामुळेही माझे त्रास बर्याच प्रमाणात सुसह्य होत होते. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘माझ्या अशा अवघड स्थितीत परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या थोर संतांचा सतत सत्संग मिळणे’, ही गुरुदेवांची माझ्यावरील कृपाच आहे.
७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !
७ आ १. वेळोवेळी साधकांद्वारे निरोप देऊन चैतन्य देणे : गुरुदेवांनी या कालावधीत मला प्रेरणा, शक्ती आणि चैतन्य देऊन संकल्पाने कार्य करून घेतले. ते मला वेळोवेळी साधकांच्या माध्यमातून निरोप देऊन मार्गदर्शन करून प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे माझ्यावर मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि कृपा यांचा वर्षाव व्हायचा.
७ आ २. वेळोवेळी प्रसाद पाठवणे : या कालावधीत मला ‘चैतन्य आणि शक्ती मिळावी’, यांसाठी प.पू. डॉक्टर गोव्याहून देवद येथे येणार्या साधकांच्या समवेत मला प्रसाद पाठवायचे.
७ आ ३. प्रकृतीची विचारपूस करणे : प.पू. डॉक्टर साधकांच्या माध्यमातून ‘माझ्यावर योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार चालू आहेत ना ?’, याची वेळोवेळी विचारपूस करायचे.
७ आ ४. वेळोवेळी आठवण काढणे : प.पू. डॉक्टर साधकांच्या माध्यमातून ‘तुम्ही कसे आहात ?’, असे निरोप देऊन विचारायचे. हा निरोपही माझ्यासाठी पुष्कळ आनंददायी आणि प्रेरणादायी असायचा. यातून ‘श्री गुरूंचे माझ्याकडे लक्ष आहे’, ही जाणीव वाढायची.
७ आ ५. आध्यात्मिक स्तरावरील उपायासांठी वस्तू पाठवणे
अ. ‘मला होणारे सर्व प्रकारचे त्रास दूर व्हावे’ आणि ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय व्हावेत’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी मला त्यांच्या हस्ताक्षरातील कागद पाठवले.
आ. त्यांनी वापरलेल्या पलंगाच्या ३ मोठ्या फळ्या माझ्यासाठी पाठवल्या होत्या. आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी त्या मी माझ्या गादीखाली आलटून पालटून अजूनही वापरतो.
इ. सप्टेंबर २०१२ मध्ये माझ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्यासाठी गुरुकृपायोगाचा लोगो आणि त्यांचे छायाचित्र पाठवले. हा त्यांनी माझ्यासाठी पाठवलेला महाप्रसादच होता. तो लोगो गळ्यात घातल्यामुळे माझ्या भोवती संरक्षणकवच निर्माण झाले आणि त्यांचे छायाचित्र देवघरात ठेवल्यामुळे मला त्यांच्या अनुसंधानात रहाता आले.
७ आ ६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संत आणि साधक यांच्या माध्यमातून चुका लक्षात आणून देऊन साधनेत होणारी हानी टाळणे : याच कालावधीत माझ्याकडून कळत-नकळत झालेल्या चुका परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सौ. अश्विनी पवार (९.७.२०१७ या िदवशी त्या सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत झाल्या.) यांच्या माध्यमातून माझ्या लक्षात आणून देऊन माझी साधनेत होणारी हानी टाळली. अन्यथा साधनेतील पुढचा टप्पा मला लवकर गाठता आला नसता. यासाठी गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
८. या कालावधीत जाणवलेली गुरुकृपेची अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
८ अ. मनात नकारात्मक विचार न येणे : गुरुदेवांच्या कृपेमुळे या कालावधीत माझ्या मनात कुठलाही नकारात्मक विचार आला नाही कि कुठलाही विकल्प निर्माण झाला नाही. हे केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळेच शक्य झाले.
८ आ. कधी मन अस्वस्थ झाले, तरी काही वेळानंतर अस्वस्थता आपोआप न्यून होणे : अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे अधूनमधून माझ्या मनाची अस्वस्थता वाढत असली, तरी वेगळे उपाय न करताही काही वेळानंतर ती पुन्हा अल्प होत असे. तेव्हा मला वाटत असे, ‘प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून माझ्यासाठी नामजपादी उपाय केले असतील.’
८ इ. ‘बुद्धीचा अडथळा येऊ न देता आज्ञापालन केल्यावर श्री गुरूंचा संकल्प कार्यरत होतो’, असे अनुभवणे : ‘बुद्धी हा साधनेतील अडथळा आहे. मी बुद्धीने विचार केला असता, तर ‘मला इतका वेळ सेवा करणे कसे शक्य आहे ?’, ‘मला बसताही येत नाही, तर मी सत्संग कसे घेणार ?’, ‘अंगात शक्ती नसल्यामुळे मला बोलताही येत नाही, तर मी इतके घंटे बोलण्याची सेवा कशी करणार ?’, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले असते; पण प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात असे कुठलेही प्रश्न आलेच नाहीत. प.पू. डॉक्टरांनी मला ज्या सेवा मला करायला सांगितल्या, त्या मी बुद्धीचा कुठलाही अडथळा न आणता करण्याचा प्रयत्न केला. बुद्धीचा वापर केवळ त्यांनी सांगितलेली सेवा अधिक चांगली करता येण्यासाठीच केला. तेही प्रयत्न त्यांनीच माझ्याकडून करून घेतले. ‘श्री गुरूंनी जे सांगितले, ते लगेच कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्यास श्री गुरूंचा संकल्प कार्यरत होतो आणि त्यांनी सांगितलेले कार्य सहज होऊन त्यातून साधनाही होते’, हे मला शिकता आले. त्यांनी त्यांच्या संकल्पानेच माझ्याकडून सर्व सेवा करून घेतल्या’, हे मी अनुभवले.
८ ई. कधी काळजी न वाटणे : माझे जे प्रारब्ध आहे, ते मला भोगावेच लागणार आहे; कारण प्रारब्धभोग भोगूनच संपवावे लागतात; पण ‘मी भगवंताची सेवा करत असेन, तर श्री गुरु निश्चितच ते सुसह्य करणार’, असा माझा भाव होता. त्यामुळे मला कधी काळजी वाटली नाही.
८ उ. सेवेच्या सततच्या व्यस्ततेमुळे देहबुद्धी न्यून होणे : गुरुदेवांनी मला एवढे व्यस्त ठेवले होते की, मला काही विचार करण्यास मोकळा वेळ मिळायचाच नाही. त्यांनी माझा सेवेचा ध्यास एवढा वाढवला होता की, ‘सेवा करतांना मला देहबुद्धीची जाणीवच रहायची नाही.’ मला अनेक संत आणि साधक म्हणायचे, ‘एवढा त्रास होत असतांना तुम्ही या सेवा कशा करू शकता ?’ याचे उत्तर होते, ‘गुरुकृपा’ !
८ ऊ. या कालावधीत मी कधीच देवाकडे ‘माझे दुखणे बरे होऊ दे’, अशी प्रार्थना केली नाही. ‘तसे करावे’, असे कधी माझ्या लक्षातही आले नाही.
९. अनुभूती
गुरुदेवांच्या कृपेमुळेच माझी शारीरिक स्थिती अत्यंत प्रतिकूल असतांनाही माझ्याकडून सेवा केली जात होती.
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।
अर्थ : ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते, त्या परमानंदस्वरूप माधवाला (श्रीकृष्णाला) मी नमस्कार करतो.
याची मी अक्षरशः अनुभूती घेतली. या जिवाचे तीव्र देहप्रारब्ध गुरुदेवांनी केवळ सुसह्य केले नाही, तर माझ्याकडून तीव्र साधना करून घेऊन आध्यात्मिक प्रगती करून घेतली. केवढे हे श्री गुरूंचे अफाट सामर्थ्य ! या कालावधीत परात्पर गुरु डॉक्टरांनी मला पुष्कळ शिकवले आणि त्यांच्यावरील श्रद्धा वाढवली. त्यांच्या माझ्यावरील या कृपेसाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
इदं न मम । (हे लिखाण माझे नाही !)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |