आर्.टी.ई. प्रवेश प्रक्रियेचे अर्ज स्वीकारण्यास ४ जूनपर्यंत मुदतवाढ !
नवी मुंबई, १ जून (वार्ता.) – खासगी शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना विनामूल्य प्रवेश (आर्.टी.ई.) प्रक्रिया २०२४-२५ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीमध्ये ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दिनांकानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाकडून २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना सर्व खासगी शाळांमध्ये (अल्पसंख्यांक शाळा वगळता) विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये प्रवेश पात्र वर्गाच्या एकूण पटसंख्येच्या २५ टक्के मुलांना विनामूल्य प्रवेश देण्यात येतो. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. प्रथम १७ ते ३१ मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये अद्यापपर्यंत ठाणे जिल्ह्यातील ६४३ शाळांमध्ये ११ सहस्र ३७७ जागांसाठी १८ सहस्र ७९६ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या नंतर शाळेत प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या पालकांनी पाल्यांच्या मूळ कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून पडताळणी केल्यावर संबंधित शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.