रायगडावर मूलभूत सुविधा मिळण्यासाठी ६ जूनपासून आमरण उपोषण करणार ! – ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे
रायगडावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि निवारा यांची वानवा !
सांगली, १ जून (वार्ता.) – हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवरायांची समाधी असलेल्या रायगडावर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि निवारा यांच्या सोयीसह इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. देशात इतर विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र शिवरायांच्या गड-दुर्गांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरकारने रायगडावर येणार्यांना मूलभूत सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी येत्या ६ जूनपासून मी ‘आमरण उपोेषण’ करणार आहे, अशी माहिती युवा कीर्तनकार आणि सुप्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रायगडावर स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय वाईट !
ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे पुढे म्हणाले, ‘‘शिवप्रेमी आणि मावळे रायगडावर येतात, त्या वेळी त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी अन् स्वच्छतागृह यांची सोय नाही. महिलांसाठी कपडे पालटण्यासाठी खोली नाही. मावळ्यांसाठी निवार्याची सोय नाही. दळणवळणाची पुरेशी साधने नाहीत. एस्.टी. (राज्य परिवहन) सुविधा अधिक प्रमाणात नाही. रायगडावर स्वच्छतागृह अतिशय वाईट अवस्थेत असून तेथे पाणीही नाही. गडावर बेवारस गुरे-ढोरे मोकाट फिरतांना दिसतात. रायगडावर नगारखान्यासमोर केवळ महत्त्वाच्या दिवशीच भगवा फडकावला जातो. हिंदूंच्या अपेक्षेप्रमाणे ३६५ दिवस २४ घंटे रायगडावर भगवा ध्वज फडकत रहावा, ही सर्व शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची इच्छा अपूर्ण आहे.’’
रायगडावर ‘रोपवे’ आस्थापनाच्या ‘स्वराज्य रिसॉर्ट अँड हॉलिडे’कडून वातानुकूलित खोल्या !
ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे म्हणाले, ‘‘रायगडावरील प्रत्येकाकडून २५ रुपये प्रवेशशुल्क आकारले जाते. ‘रोपवे’ खासगी आस्थापनाचा मनमानी कारभार चालू आहे. गडावर सर्वसामान्य शिवप्रेमींना मुक्कामाची कुठेही सोय नाही; परंतु कुणी जर ‘ऑनलाईन’ तिकीट घेतले, तर संबंधितांना वातानुकूलित आणि विना वातानुकूलित खोल्यांत गडावर मुक्काम करता येतो. विशेष म्हणजे या सर्व गोेष्टीचे रोपवे आस्थापनाने ‘स्वराज्य रिसॉर्ट अँड हॉलिडे’, असे नामकरण केलेले आहे. ज्या गडावर आपण स्वराज्य निर्माण केले, त्या गडावर या रोपवे या आस्थापनाने ‘रिसॉर्ट’ निर्माण केले. ही अतिशय दुःखदायी आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. ‘एम्.टी.डी.सी.’कडूनही (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडूनही) गडावर खोल्यांचे काम चालू आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य शिवप्रेमींसाठी रायगडावरील मुक्काम बंद करण्यात आला होता; मात्र अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन रोपवे आस्थापनाने श्रीमंत लोकांसाठी रायगडावर मुक्कामी सोय करून ठेवली आहे. शिवरायांच्या काळात रायगडावर कधीच भेदभाव झालेला नाही. मग हा गरीब-श्रीमंत भेद कशासाठी ? तुमच्याकडे पैसे असतील, तर तुम्ही रायगडावर मुक्कामी राहू शकता, हा अन्याय आहे. पाचाड या ठिकाणी बांधलेली धर्मशाळा गडाच्या पायथ्याशी मावळ्यांना निवार्यासाठी उघडी करून द्यावी; पण तसे न होता ३६५ दिवस त्या ठिकाणी कुलूप लावून केवळ महत्त्वाच्या दिवशी तिचा वापर केला जात आहे. या सर्व गोष्टी थांबायला हव्यात.’’
ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांनी केलेल्या मागण्या
१. गडावरील पायरीमार्गावर आणि पायथ्याशी ‘फिल्टर’ बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
२. गडावर स्वच्छतागृहे आणि महिलांसाठी कपडे पालटण्याची खोली बांधावी.
३. महाड एस्.टी. थांबा ते रायगड येथे प्रत्येक घंट्याला शटल एस्.टी. चालू करावी.
४. आळंदी (जिल्हा पुणे) ते रायगड येथे पहिली एस्.टी. बस सेवा चालू करावी.
५. रायगडावर जाण्यासाठी ‘रोपवे’चे (गडावर जाण्या-येण्यासाठी स्वयंचलित ट्रॉलीची व्यवस्था) तिकीट अल्प करून प्रत्येकाला एका फेरीसाठी १०० रुपये आकारण्यात यावेत.
६. लोकांकडून आकारले जाणारे २५ रुपये प्रवेशशुल्क कायमस्वरूपी बंद करावे.
७. पाचाड येथील जिल्हा परिषदेची धर्मशाळा नित्य येणार्यांना निवार्यासाठी उपलब्ध करून द्यावी.
८. रोपवे आस्थापनाकडून ९०० रुपये घेऊन रायगडावर रहाण्यासाठी ऑनलाईन नोंद केली जाते, ती रहित करून तेथे गडावर येणार्यांना रहाण्याची अनुमती द्यावी किंवा सरसकट रहाण्यास बंदी करण्यात यावी.
९. तीर्थक्षेत्र आराखड्यात रायगडास शासनाने ‘अ’ दर्जाची श्रेणी देऊन रायगडाचा विकास करावा.
१०. गड-दुर्ग महामंडळाची स्थापना करण्यात यावी.
११. रायगडावर ३६५ दिवसांतील २४ घंटे नगारखान्यासमोर भगवा ध्वज फडकत ठेवण्यात यावा.
१२. गडावर होणारी कामे दर्जेदार व्हावीत. मनोर्यांचे सुशोभिकरण आणि संरक्षण करण्यात यावे. उगवलेले गवत काढावे.
संपादकीय भूमिकाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला गडावरील असुविधा दिसत नाहीत का ? |