साधकांनो, आध्यात्मिक त्रास उणावण्यासाठी तळमळीने आणि श्रद्धेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करा !

पू. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) यांचे अनमोल विचारधन !

पू. गुरुनाथ दाभोळकर

‘मी एखाद्या साधकाची आत्मीयतेने विचारपूस करतो, तेव्हा तो साधक मला त्याच्या त्रासाविषयी सांगतो. तेव्हा तो फार उदास असल्याचे माझ्या लक्षात येते. तो साधक सांगतो, ‘‘मला वाईट शक्ती पुष्कळ त्रास देत आहेत. मला काही सुचत नाही. माझ्याकडून सेवा होत नाही. माझ्या मनात अनावश्यक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण अधिक आहे. माझे शरीर दुखते. माझ्याकडून स्वयंसूचना सत्रे आणि व्यष्टी साधनेचे लिखाण होत नाही.’’ तेव्हा मी साधकाला सांगतो, ‘‘वाईट शक्ती मला फार त्रास देते’, असे सतत न म्हणता ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य ग्रहण करण्यास उणे पडतो’, असे म्हणावे. असे केल्याने आपल्यासमोर वाईट शक्तींचा चेहरा न येता किंवा त्यांचे स्मरण न होता, आपल्या प्रिय परात्पर गुरु डॉक्टरांचे आशीर्वादरूपी हास्यवदन आपल्या डोळ्यांसमोर येईल आणि आपल्याला त्यांचे चैतन्य मिळून त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येईल. त्यामुळे वाईट शक्तींची शक्ती उणावेल आणि त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोर निभाव न लागता त्यांची काळी शक्ती न्यून होऊन त्या हतबल होतील. परिणामी आपला आध्यात्मिक त्रास उणावेल. यासाठी आपण तळमळीने आणि श्रद्धेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करूया.’

– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.