परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन 

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य आरंभ केले. त्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी आनंदप्राप्तीसाठी साधनेसंबंधी अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक लहान-मोठी प्रवचने घेणे, असे विविध मार्ग अवलंबले. आता सर्वत्रचे सहस्रो साधक त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली. या लेखमालेत त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन देत आहोत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करणाऱ्यांवर वाईट शक्तींचे आक्रमण होणे, हे ‘साधना चांगली होत आहे’, याचे प्रमाणपत्रच आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुत्वनिष्ठ : साधना करतांना शारीरिक त्रास पुष्कळ होतात. साधना आरंभ करण्यापूर्वी मला काही त्रास होत नव्हता. काही दिवसांपासून साधना करतांना मला थोडा त्रास होत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण साधना करतो, म्हणजे आपण ईश्वराच्या पक्षातील होतो. वाईट शक्तींना पृथ्वीवर रावणाप्रमाणे त्यांचे स्वत:चे राज्य हवे आहे. आपण जेव्हा साधना करतो, तेव्हा वाईट शक्ती साधनेमध्ये विघ्ने आणतात. वाईट शक्ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक असे सर्व प्रकारचे त्रास देतात. हेच देवासुर सूक्ष्म युद्ध आहे.

हिंदुत्वनिष्ठ : आता माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे सांगितले गेले. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर साधना करण्यात पुष्कळ अडचणी येत आहेत. मला साधनेत आणखी पुढे जायचे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्या सनातन संस्थेच्या कितीतरी संतांना आध्यात्मिक त्रास आहेत. जेवढी आध्यात्मिक पातळी वाढेल आणि समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे) करणार्‍यांना पुष्कळ त्रास होतो. व्यष्टी साधना (म्हणजे व्यक्तीगत आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणारे) करणार्‍यांना विशेष त्रास होत नाहीत. अशी ‘साधना करणारा एकटा जीव विशेष त्रासाविना ईश्वरापर्यंत पोचेल’, असे होईल. त्याच्याशी वाईट शक्तींना काही घेणे-देणे नसते; परंतु ‘जेव्हा आपण ‘हिंदु राष्ट्र पृथ्वीवर आणायचे’, असा विचार करतो, तेव्हा वाईट शक्ती येथे (हिंदु राष्ट्रात) राहू शकत नाही’, असे होते. वाईट शक्तींच्या मनात एकदम आपल्याविषयी द्वेष निर्माण होतो. त्यामुळे वाईट शक्ती समष्टी साधना करणार्‍या साधकांवर अधिक आक्रमण करतात.

वर्ष २००२ पासून आमचे आध्यात्मिक स्तरावरचे युद्ध चालू झाले. तेव्हापासून साधकांना पुष्कळ आध्यात्मिक त्रास होऊ लागले. आतासुद्धा रामनाथी आश्रमात २५० साधक रहातात. ‘त्यातील जवळ जवळ ४० – ५० साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे.’ सर्वत्रच्या साधकांचीसुद्धा हीच स्थिती आहे. हे पाहून त्या वेळी लोक आम्हाला चिडवत होते. ते म्हणत होते, ‘‘आम्हीसुद्धा साधना करतो. आम्हाला वाईट शक्तीचे त्रास होत नाहीत. तुम्हाला होतात, याचा अर्थ तुमचा साधनामार्ग चुकीचा आहे.’’

७ अ. सनातनचे साधक धर्माचे कार्य करतात, म्हणून त्यांच्यावरच वाईट शक्ती आक्रमणे करतात ! – एक संत

परात्पर गुरु डॉ. आठवले : मी पुष्कळ संतांकडे गेलो. त्यांना विचारत राहिलो, ‘माझ्या साधनेत काही चुकीचे असेल, तर मला सांगावे. आम्ही सुधारणा करू !’ आम्ही साधकांना त्रास देण्यासाठी साधना करत नाही.’ तेव्हा एका संतांनी सांगितले, ‘‘सर्वांना अभिमानाने सांगा की, आम्हाला वाईट शक्तींचे त्रास होतात.’’ मी विचारले, ‘‘यामध्ये अभिमानाची कोणती गोष्ट आहे ?’’ त्यांनी सांगितले की, ‘‘चोर कधी गरिबाच्या घरी चोरी करायला जात नाही. तो श्रीमंताच्याच घरी जातो. त्याच प्रकारे जे धर्माचे कार्य करतात, त्यांच्यावरच वाईट शक्ती आक्रमणे करतात. तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळाले की, तुम्ही धर्माचे चांगले कार्य करत आहात. त्यासाठी तुम्हाला वाईट शक्तींचे त्रास आहेत.’’

बहुतेकजण व्यष्टी साधना करतात. पुष्कळसे सकामातील (म्हणजे व्यावहारिक फलप्राप्तीसाठी) भक्ती करतात. ‘‘तुमच्याकडे असे वाईट शक्तींचे त्रास होतात, तर त्याची चिंता करू नका. हे वाईट शक्तींचे त्रास होणे, हे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) आहे. तुमची साधना चांगली चालू आहे (तुम्ही जी साधना सांगितली ती योग्य आहे). वर्ष २०१८ नंतर परिवर्तनाची वेळ (टर्निंग पॉइंट) येणार आहे. नंतर आमचा सूक्ष्मयुद्धात, म्हणजे आध्यात्मिक स्तरावरील विजय होण्यास आरंभ होईल. त्यानंतर स्थुलातील, म्हणजे प्रत्यक्ष महायुद्धाला आरंभ होईल. काळजी करू नका. गर्वाने सांगा.’’

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.