मुलीला बीजांडकोशात (‘ओव्हरी’त) गळू (सिस्ट) झाल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या उपायांमुळे त्रास दूर होणे

१. मुलीचा पोटदुखीचा त्रास औषधोपचाराने अल्प न होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘माझ्या मुलीला पोटदुखीचा तीव्र त्रास चालू झाला होता. तिला ओटीपोटाच्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, उलट्या आणि जुलाब होणे, मळमळणे इत्यादी त्रास चालू झाले. मी तिला बालरोगतज्ञांकडे घेऊन गेले. त्यांनी मुलीला विषबाधा झाल्याचे निदान करून औषधोपचार चालू केले; परंतु मुलीचे त्रास अल्प झाले नाहीत.

२. पोटातील गाठ कर्करोगाची असल्याचे सांगून त्वरित शस्त्रकर्म करण्यास आधुनिक वैद्यांनी सुचवणे

त्यानंतर मुलीची सोनोग्राफी (विशिष्ट ध्वनीलहरीच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी) केल्यावर ‘तिच्या पोटात बिजांडकोशात गळू म्हणजे ‘कॅन्सरसिस्ट’ आहे’, असे निदान झाले. त्यामुळे तिचे शस्त्रकर्म करण्याचे तज्ञ वैद्यांनी सुचवले. ‘शस्त्रकर्म न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात’, असेही त्यांनी सांगितले.

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करून चाचणी केल्यावर बीजांडकोशातील गाठीच्या ठिकाणी केवळ रक्ताची गाठ दिसणे

आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारून घेतले. त्यांनी आम्हाला ‘श्री दुर्गादेव्यै नमः, श्री गुरुदेव दत्त, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय’, हा जप करण्यास सांगितले. तो आम्ही भावपूर्णपणे एक घंटा केला. दुसर्‍या दिवशी आम्ही रुग्णालयात जाऊन ‘एम्.आर्.आय्.’ (रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत भागाची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान) आणि सोनोग्राफी केली. त्या चाचणी अहवालावर वैद्यांचा विश्वास बसला नाही; म्हणून त्यांनी पुन्हा चाचणी केली. शेवटी ते आम्हाला म्हणाले, ‘‘हे काहीतरी चमत्कारिक आहे; कारण काल सोनोग्राफीमध्ये बिजांडकोशात गळू दिसत होते; मात्र आता त्या ठिकाणी साधी रक्ताची गाठ दिसत आहे. ही गाठ मासिक पाळी आल्यावर सहजपणे गळून जाऊ शकते.’’

४. नामजपादी उपाय आणि होमिओपॅथीची औषधे घेतल्यावर रक्ताची गाठ शरिराबाहेर पडणे

आम्ही आरंभापासून होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांच्याकडून औषधे घेत होतो. रक्ताची गाठ शरिराबाहेर पडण्यासाठी आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः, श्रीराम जय राम जय जय राम, श्री हनुमते नमः, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय’, हा जप केला. त्यामुळे रक्ताची गाठ दीड मासात शरिराबाहेर पडली. आम्हाला पुष्कळ आनंद झाला.

आम्हाला मोठ्या संकटातून वाचवून मोठी अनुभूती देणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– एक साधिका  (२८.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक