‘मराठा साम्राजाचे चलन’ या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये चिपळूण येथील गौरव लवेकर यांच्या संग्रहातील ३ नाण्यांची निवड

श्री. गौरव लवेकर

चिपळूण, १ जून (वार्ता.) – शहरातील खेंड येथील श्री. गौरव लवेकर हे गेली १० वर्षे नाणीसंग्रह करण्याचा छंद जोपासत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून  ८०० शिवकालीन नाण्यांचा संग्रह केला आहे. त्यांच्या या छंदाला दाद मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आणि भारत देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे, या निमित्ताने शिवकालीन नाण्यांची लोकांना माहिती मिळावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने ‘मराठा साम्राजाचे चलन’ या ‘कॉफीटेबल बुक’ची निर्मिती केली. या पुस्तकात सर्वाेत्तम ४ ‘डॉटेड’ शिवराई नाण्यांची छायाचित्रे निवडण्यात आली. या ४ नाण्यांमध्ये ३ नाणी श्री. गौरव लवेकर यांच्याकडील आहेत.
लवेकर हे मूर्ती घडवणारे प्रसिद्ध कुटुंब. श्री. गौरव लवेकर यांचे आजोबा मूर्तीकार होते. त्यांच्या पश्चात गौरवचे वडील श्री. शेखर लवेकर यांचा सुवर्णालंकाराचा व्यवसाय आहे.

शिवकालीन नाणी

सोन्या-चांदीच्या घडणावळीमुळे लवेकर कुटुंबियांच्या घरी विविध प्रकारची नाणी यायची. त्यामुळे श्री. गौरव यांना नाणी संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. वर्ष २०१४ पासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नाणी संग्रह करण्यास प्रारंभ झाला. शिवकालीन, ब्रिटीश, मोगल, तसेच संस्थानिकांची नाणीही त्यांच्या संग्रहात आहेत. या नाणीसंग्रहासाठी त्यांनी १० वर्षांच्या कालावधीत पंढरपूर, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी प्रवास केला. पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरे, तीर्थक्षेत्र, गडकिल्ले यांना भेटी दिल्या. मुंबई क्वॉईन सोसायटीचे ते सदस्य आहेत.

वर्ष १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवराई नाण्यांची निर्मिती झाली. या कालावधीतील अनेक नाणी त्यांनी संग्रहित केली आहेत. यामध्ये दुदांडी शिवराई, बिंदूमय रायगडी शिवराई (डॉटेड), ‘हाफ डॉटेड’ शिवराई, तंजावर शिवराई, ‘लेटर’ शिवराई आदींचा समावेश आहे. वर्ष १८३० नंतरच्या ब्रिटिश काळातील नाण्यांचा संग्रहही त्यांच्याकडे आहे.

देहली येथे लाल किल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकासाठी राज्यभरातून नामवंत तज्ञ आणि नाणी संग्रहक यांनी नाणी पाठवली होती. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातील दर्शिनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव लेखक डॉ. दिलीप बलसेकर यांनी राज्यभरातील नाणी संग्रहकांकडून नाण्यांची छायाचित्रे जमवली.