LokSabha Elections 2024 : यंदा लोकसभा निवडणुकीवर खर्च झाले १ लाख ३५ सहस्र कोटी रुपये !

एका मतासाठी १ सहस्र ४०० रुपये करावे लागले खर्च !

नवी देहली – वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट खर्च झाल्याचा अंदाज आहे. वर्ष २०१९ च्या निवडणुकीवर ५५ ते ६० सहस्र कोटी रुपये खर्च झाले होते. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या अंदाजानुसार यंदा लोकसभा निवडणुकीचा खर्च १ लाख ३५ सहस्र कोटी रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे. यामुळे एका मताची किंमत अर्थात् एका मतामागे जवळपास १ सहस्र ४०० रुपये खर्च झाले आहेत. वर्ष २०२० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जितका खर्च झाला नाही त्याहून अधिक खर्च भारताच्या यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीवर झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर त्या वेळी १ लाख २० सहस्र कोटी रुपये खर्च झाले होते.

१. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. विधानसभा निवडणुकीत खर्चाची सीमारेषा २८ लाख ते ४० लाख आहे. अरुणाचल प्रदेशसारख्या छोट्या राज्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार ७५ लाख, तर विधानसभा निवडणुकीत २८ लाख खर्च करू शकतो. स्वातंत्र भारतात पहिल्यांदा लोकसभा निवडणूक वर्ष १९५१-५२ मध्ये पार पडली. त्या वेळी प्रत्येक उमेदवाराला २५ सहस्र रुपये खर्च करण्याची अनुमती होती; मात्र आता त्यात जवळपास ३०० टक्के वाढ झाली आहे.

२. राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाला प्रत्येक वर्षी खर्चाची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच निवडणूक निधीची माहिती द्यावी लागते. यासह निवडणूक संपताच पुढील ७५ दिवसांत खर्चाचा तपशील द्यावा लागतो. ही माहिती आयोग त्याच्या संकेतस्थळावर प्रसारित करतो.

संपादकीय भूमिका 

इतके पैसे खर्च करूनही जनता मतदान करायला जात नाही. यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांवरही आता चर्चा होणे आवश्यक आहे !