राज्यातील ४०० संभाव्य भूस्खलन क्षेत्रातील नागरिकांना हलवणार !

इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क !

मुंबई, १ जून (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये संपूर्ण डोंगर कोसळून २७ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी राज्यातील ४०० संभाव्य भूस्खलन क्षेत्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

हवामान विभागाच्या अनुमानानुसार यावर्षी महाराष्ट्रात १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपत्कालीन साहाय्यासाठी राज्यशासनासह महानगरपालिकांनाही स्वतंत्र ‘आपत्ती प्रतिसाद दल’ सिद्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. सागरी दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि राज्य आपत्ती निवारण पथक यांच्या सिद्धतेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आपत्काळात साहाय्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पूरप्रवण भागांत ७ सहस्र ९०० स्वयंसेवक साहाय्यासाठी सिद्ध !

राज्यातील २० पूरप्रवण जिल्ह्यांत आपत्कालीन साहाय्यासाठी ७ सहस्र ९०० स्वयंसेवक सिद्ध रहाणार आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणासाठी हे स्वयंसेवक कार्यरत रहातील. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार एकूण १२१ रबराच्या बोटी देण्यात आल्या आहेत.

आपत्ती निवारण पथके १० जिल्ह्यांत कार्यरत रहाणार !

नांदेड आणि गडचिरोली येथे जिल्हा आपत्ती निवारण पथके कार्यरत रहाणार आहेत. रायगड, पालघर, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके कार्यरत असणार आहेत.

संपादकीय भूमिका

यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती निवारणाच्या सिद्धतेचा आढावा !