पिंपरी-चिंचवड येथे जितेंद्र आव्हाड यांच्या छायाचित्रास ‘जोडे मारा’ आंदोलन !
पिंपरी (जिल्हा पुणे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवारगट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला. त्या विरोधात भाजपच्या ‘अनुसूचित जाती मोर्चा’च्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या छायाचित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. त्यांच्या या कृतीवर त्यांच्या पक्षाकडून कुठलीही नोंद घेतली जात नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून त्या घटनेचे समर्थन केले जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या वेळी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, सरचिटणीस संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.