राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यामुळेच काशीचे पुनर्निर्माण झाले ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार, भाजप
सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन !
सांगली, ३१ मे (वार्ता.) – ‘अयोध्या, मथुरा आणि काशी यांचा विध्वंस परकीय राजवटीने केला. त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुढाकार घेऊन जुन्या मंदिराशेजारी नवीन मंदिर बांधून श्री शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. तिथे नित्य पूजा-अर्चा चालवण्यासाठी योग्य ती सोय केली आणि काशीची पूज्य परंपरा अबाधित ठेवली. अन्यथा अयोध्येच्या श्रीराममंदिराची दुरवस्था झाली तशी काशीची अवस्था झाली असती. देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीचे माहात्म्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा प्रस्थापित केले. राजमाता अहिल्यादेवींचे हे उपकार हिंदु समाज कधीच विसरणार नाही’, असे विचार भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथे व्यक्त केले.
सांगली येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस अभिवादन करतांना त्यांनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले. या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, सरचिटणीस विश्वजित पाटील, अविनाश मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मिरज महापालिकेच्या कार्यालयात अभिवादन !
मिरज – सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीदिनी उपआयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. या वेळी आस्थापनाचे अधिकारी विनायक शिंदे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.