समाधानाची कमाई !
आपल्या देशात सुशिक्षित तरुणांची संख्या पुष्कळ आहे. आधुनिक वैद्य, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले विविध क्षेत्रांतील लाखो विद्यार्थी देशात आहेत; परंतु त्यांतील अनेकांकडे नोकर्या नाहीत किंवा अल्प वेतनाच्या नोकरीतच त्यांना समाधान मानावे लागते. याविषयीच्या अनेक तक्रारी सर्रास ऐकायला मिळतात. अल्प वेतनामुळे शिक्षणासाठी व्यय केलेला पैसा अन् वर्षे वाया जातात कि काय ? अशी स्थिती निर्माण होऊन लोक कंटाळून जातात अन् निराशाग्रस्त होतात. केवळ शिक्षणावर पुष्कळ पैसा ओतूनही हातात काही न लागल्यामुळे काही लोकांचे मनोबल न्यून होऊन ते आत्महत्याही करतात. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील एका १०-११ वर्षाच्या मुलाची दिवसाची कमाई किमान १ सहस्र ते दीड सहस्र रुपयांपर्यंत आहे. सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या या व्हिडिओतून हे लक्षात आले आहे. हा मुलगा अयोध्या घाटाच्या किनारी तेथे दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या माथ्यावर टिळा लावण्याची सेवा करतो. प्रतिदिन सकाळी ६ ते १० या वेळेत तो १ सहस्र रुपये कमावतो. हाच मुलगा संध्याकाळी दर्शनाला येणार्या भाविकांच्या माथ्यावर चंदन लावतो आणि त्या ४-५ घंट्यांत ५०० रुपये कमावतो अन् उदरनिर्वाह करतो. एखाद्या सुशिक्षित तरुणाला लाजवेल एवढी कमाई करणार्या त्या मुलाच्या चेहर्यावरील समाधान आणि निरागसता पाहून व्हिडिओ काढणारी व्यक्ती अवाक् होते. खरेतर ही त्या मुलावरील श्रीरामाची कृपाच म्हणावी लागेल !
देशात विविध मंदिरे आहेत. मंदिराच्या ठिकाणी टिळा लावणे, स्वच्छता करणे अथवा तेथील अन्य सेवा करणे, म्हणजे काहींना कमीपणाचे वाटते. म्हणूनच कुणी त्या मुलाप्रमाणे टिळा लावण्याची सेवा करण्यास सिद्ध होईलच, असे नाही. समाजात १०-११ वर्षांच्या मुलांची दिनचर्या पाहिल्यास भ्रमणभाषवर घंटोनघंटे घालवण्यातच बहुतांश वेळ निघून जातो. तरुणांनी देवाला नमस्कार करणे, सायंकाळी शुभंकरोती, स्तोत्रे, श्लोक म्हणणे या गोष्टी तर आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्या तुलनेत प्रतिदिन लवकर उठून दिवसातील ८-९ घंटे भाविकांना टिळा लावण्याची सेवा आनंदाने करणारा अयोध्येतील १० वर्षांचा मुलगा कौतुकास पात्र आहे. टिळा लावल्याने पुरुषांना शिवतत्त्वाचाही लाभ होतो अन् चैतन्य मिळते. आज सर्वसामान्य लोक धार्मिक गोष्टींपासून दूर जात आहेत. सण-उत्सव सोडले, तर दैनंदिन जीवनात देव-धर्माचा विसर पडल्यामुळे किंबहुना धार्मिक उपासनेमुळे होणार्या आध्यात्मिक लाभाचे महत्त्व समजून न घेतल्याने धार्मिक गोष्टींसाठी कुणी फार वेळ देत नाही. त्यामुळे अयोध्या घाटावर दर्शनासाठी येणार्यांना टिळा लावणार्या लहान मुलाच्या व्हिडिओला केवळ ‘लाईक’ (आवडले) करण्यापेक्षा त्याच्यासारखी सेवा करणे देवाला आवडेल ! पालकही त्यासाठी प्रयत्न करू शकतात !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.