छत्रपती संभाजीनगर येथील बार आणि मद्य दुकानांची संयुक्त पडताळणी करा ! – जिल्हाधिकार्यांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर – ‘अल्पवयीन मुलांचे मद्यप्राशन, तसेच मद्य पिऊन वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी संयुक्त पथके स्थापन करून परमिट रूम, बिअरबार, मद्यविक्री दुकाने, वाहने यांची पडताळणी करावी, यासमवेतच पालक आणि मुले यांचे प्रबोधन करावे’, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी २९ मे या दिवशी येथे दिले.
‘अल्पवयीन मुलांमध्ये मद्यप्राशन आणि अन्य व्यसनाधीनता त्यातून होणारे गुन्हे, अपघात इत्यादी प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली. या वेळी सर्व विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात ३६ मद्य विक्री दुकाने, ८२२ परमिट रुम बिअर बार, १०६ बिअर शॉपी, १४२ देशी मद्याची दुकाने आहेत. मद्य विक्री दुकानांना सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत, परमिट रूम बिअरबार सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा आहे’, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली.
‘छुप्या मद्यविक्री आणि मद्यसेवन यांवरही लक्ष ठेवून कारवाई करा. मद्य पिऊन वाहन चालवणार्यांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ (श्वसन विश्लेषक) यंत्राद्वारे पडताळणी करण्यात यावी. सर्व मद्यविक्री दुकानांवर अल्पवयीन (२१ वर्षांहून अल्प वय) मुलांना मद्य विक्री न करणे, परमिट रूम-बिअरबार मध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश न देण्याविषयी सर्व बारचालक आणि मद्यविक्रेते यांना सक्त कार्यवाहीच्या सूचना देणे. याविषयी बार आणि मद्य विक्री दुकानांच्या अचानक पडताळण्या करण्यात याव्यात. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस विभाग, महानगरपालिका, परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि अन्य संबंधित विभागांचे संयुक्त पथक सिद्ध करावे’, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.