सिद्धगिरी रुग्णालयात हृदयरोग रुग्णांना विनामूल्य उपचार मिळणार ! – डॉ. गणेश इंगळे
कोल्हापूर, ३० मे (वार्ता.) – अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच छताखाली हृदयरुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आज अगदी लहान वयातील तरुणांनाही हृदयरोगाचा सामना करावा लागतो. त्यासाठी सिद्धगिरी रुग्णालयात सर्वसामान्यांना आवश्यक अशा कोरोनरी अँजिओग्राफी, कोरोनरी अँजिओप्लास्टी, पेरीफेरल इंटरव्हेंशन-रिनल अँजिओग्राफी, रिनल अँजिओप्लास्टी, कायमस्वरूपी पेसमेकर रोपण हे उपचार केले जातात. तरी यापुढील काळात कणेरी मठ येथील सिद्धगिरी रुग्णालयात हृदयरोग रुग्णांना विनामूल्य अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत, अशी माहिती हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी डॉ. प्रकाश भरमगौडर, प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, शंकरारूढ स्वामीजी आणि श्री. विवेक सिद्ध उपस्थित होते.
प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘हे सर्व उपचार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार विनामूल्य, माफक आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हृदयरुग्णांकरिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी हृदयरोग विभाग’ आशेचा किरण ठरेल. या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा.’’