कुडाळ येथे गोदामातील धान्याला लागलेल्या किडीमुळे ग्रामस्थांना त्रास
संतप्त ग्रामस्थांनी गोदाम अधिकार्यांना घेराव घालून खडसावले
कुडाळ – महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात अधिक प्रमाणात साठा केल्याने धान्याला मोठ्या प्रमाणावर ‘कीड’ (टोका) लागली आहे. या किडी मोठ्या प्रमाणात घरात आढळू लागल्याने गोदामाच्या जवळ असलेल्या नेरूर गावातील गोंधयाळे या वाडीतील रहिवासी त्रस्त झाले होते. अखेर संतप्त ग्रामस्थांनी ३० मे या दिवशी वखार महामंडळाच्या येथील कार्यालयात जाऊन अधिकार्यांना खडसावले. ‘या समस्येपासून मुक्त करण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली.
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम असून गोदामाच्या बाजूलाच गोंधयाळेवाडी आहे. या किडी घरात येतात, संपूर्ण घरात पसरतात; जेवण आणि कपडे यांत पडतात. या किडी चावल्या, तर खाज सुटते. कानात गेल्या, तरीसुद्धा मोठी इजा होऊ शकते. गेली १० वर्षे येथील रहिवासी साधारण मे मासात या किडींचा त्रास सहन करत आहेत; परंतु यावर्षी याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी यापूर्वी वखार महामंडळाच्या अधिकार्यांना निवेदन देऊन या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली होती; परंतु कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संघटित होऊन वखार महामंडळाच्या कार्यालयात जाऊन गोदामच्या कनिष्ठ अधीक्षक समृद्धी नांदगावकर यांना खडसावले.
आज पनवेल येथून अधिकारी येऊन करणार पहाणी
या वेळी आलेले तहसीलदार वीरसिंह वसावे यांनाही समस्या सांगण्यात आल्या. त्यानंतर वसावे आणि नांदगावकर यांनी वखार मंडळाच्या पनवेल येथील वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होत नव्हता. अखेर जिल्हाधिकार्यांनी पनवेल येथे संपर्क केल्यानंतर वखार मंडळाच्या अधिकार्यांनी ३१ मे या दिवशी कुडाळ येथे येत असल्याचे सांगितले. त्यामुळे हे अधिकारी आल्यानंतर या समस्येवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.