राष्ट्रविचारक आणि वक्ते असणारे दादूमिया !
‘पण मी काय म्हणतो’,या वाक्याचा प्रारंभ आणि ‘हां ना राव’, या वाक्याची अखेर करणारे बडोद्याचे प्रख्यात स्तंभलेखक, राष्ट्रविचारक, वक्ते असणारे डॉ. दामोदर विष्णु नेने (दादूमिया) यांचे नुकतेच निधन झाले. स्वमताचे आग्रही; पण तरीही परमत जाणून घेणारे असे ते व्यासंगी व्यक्तीमत्त्व होते ! राष्ट्रविचारकांच्या पंक्तीतील एका पर्वाची ९५ व्या वर्षी अखेर झाली. त्यांनी आपल्याकडील जवळपास ५ सहस्र दुर्मिळ आणि उत्तमरित्या बांधणी (बाईंड) केलेल्या पुस्तकांचा खजिना प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी यांच्या आळंदी (जिल्हा पुणे) येथील ‘वेदश्री प्रकल्पा’च्या ग्रंथालयाकडे सुपुर्द केला होता.
१. दादूमिया यांची पार्श्वभूमी आणि त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये लिखाण करणे
बडोद्यातील त्यांच्या आणि आमच्या घरातील अंतर केवळ ४ मिनिटांचे होते. कोरोना महामारीनंतर ते रावपुरा सोडून अन्यत्र अधिक मोठ्या घरात रहायला गेले. बडोद्याला गेलो की, दादूमियाकडे जाऊन गप्पा मारणे, हा आनंदानुभव असायचा ! गुजराती शैलीच्या खास बडोदा मराठीत ते संवाद साधायचे ! गप्पांच्या नादात काही घंटे वाहून जायचे. अनेक विषयांसोबत आमचे सद्गुरु स्वामी वरदानंद भारती हा कायम विषय असायचा. ‘स्वामीजींची पुस्तके म्हणजे ‘हिंदुत्वाचा ज्ञानकोश’ आहेत’, असे ते म्हणत. उभयतांचा पत्रव्यवहारही चालत असे. या सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नीचे, वैजयंतीकाकूंचे पाहुणचारावर विशेष लक्ष असे !
वर्ष १९३१ मध्ये सधन घराण्यात जन्मलेल्या आणि डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेल्या या अवलिया लेखकाने आपल्या एका मुसलमान रुग्णाच्या नावावरून ‘दादूमिया’ हे टोपण नाव घेतले. ‘माणूस’, ‘केसरी’, ‘सोबत’, ‘धर्मभास्कर’, ‘सामना’, ‘कॅरावान’, ‘विकली’ अशा अनेक नियतकालिकांतून त्यांनी स्तंभलेखन केले. त्यांचे आजोबा आणि वडील हे महाराजा सयाजीराव (तिसरे) गायकवाड यांचे स्वीय साहाय्यक होते. वर्ष १९५६ पासून चालू केलेल्या रुग्णसेवेसह त्यांनी लेखन, वाचन आणि व्याख्यान यांची आवडही जोपासली. मराठीसह ते इंग्रजी आणि गुजरातीतही लेखन करत असत.
जुन्या पिढीतील आणि शिकागो स्थित असलेले श्रीधर दामले, मुंबईतील अरविंद विठ्ठल कुलकर्णी आदींशी त्यांचे उत्तम जमे, तर नंतरच्या पिढीतील आमच्यासारखे कित्येक जण अन् नव्या पिढीतील विक्रम मानेकर, तसेच चिरायू पंडित आदींशी त्यांचे उत्तम जमत असे. त्यांच्यासाठी ‘वाल्मीकि रामायण’मधील पुढील श्लोक उपयोगी आहे –
उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्यास्ति लोकेऽस्मिन् न किञ्चिदपि दुर्लभम् ।।
– वाल्मीकि रामायण, किष्किन्धाकाण्ड, सर्ग १, श्लोक १२१
अर्थ : हे बंधू, उत्साहच बलवान असतो. उत्साहाहून अधिक श्रेष्ठ कुठलेही बळ नाही. उत्साही पुरुषासाठी संसारात कुठलीही वस्तू दुर्लभ नाही.
२. दादूमिया यांनी केलेले विपुल लेखन
वर्ष १९६६ मध्ये ‘कॅन इंदिरा ऍक्सेप्ट धिस चॅलेंज’ हे त्यांचे पहिले पुस्तक ‘विजयानंद भारती’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाले. या पुस्तकाची नोंद खुद्द इंदिरा गांधींनी घेतली. कालांतराने दादूमियांशी त्यांची भेटही घडली. याखेरीज ‘दलितांचे राजकारण’, ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड’, ‘मोदी एक झंझावात’, ‘गुजरातला जेव्हा जाग येते’, ‘मुस्लिम अपिझमेंट’ आणि ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची पुस्तकेही गाजली. सयाजीरावांवरील पुस्तकात त्यांनी ‘जर्मनीत हिटलरशी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने सयाजीरावांनी गुप्त करार केला होता’, असे नमूद करून खळबळ माजवली होती. ‘एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या अनेक खंडी प्रकल्पाचे कामही ते करत होते.
३. सर्व नेत्यांशी असलेली जवळीक
‘आणीबाणीच्या काळात तेव्हा रा. स्व. संघाचे प्रचारक असलेले नरेंद्र मोदी आपल्या घरी वारंवार भेट देत असत’, अशी आठवण त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितली होती.
राष्ट्रविचारक आणि वक्ते असणारे दादूमिया !
संघकार्याला मानणारे असल्यामुळे नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक होतीच; पण विरोधी विचारांचे यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, ना.ग. गोरे आणि एस्.एम्.जोशी यांच्याशीही त्यांचा स्नेह होता.
वाचकप्रिय असलेल्या दादूमियांचा लोकसंग्रहही मोठा होता. ते बोलतांना ज्या आविर्भावात बोलत ते पाहून आणि ऐकून समोरचा माणूस त्यांचा ‘फॅन’ (चाहता) होत असे. जुन्या पिढीतील एकेक तारे अस्तंगत होत आहेत, तथापि त्यांनी साहित्य रूपाने त्यांचा ठेवा पुढच्या पिढ्यांच्या हाती सुपुर्द केला आहे. त्यातून विचारकण वेचणे, हे आपल्या हाती आहे.
– डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे (भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांचे चिरंजीव), हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली.