सुटीतील संस्कार !
शाळांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्या चालू झाल्या की, उन्हाळी शिबिरांना पेव फुटते. अनेक ठिकाणी गायन, वादन, नाट्य, अभिनय, नृत्य, साहसी खेळ, गिर्यारोहण, पोहणे अशा विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. वाढत्या स्पर्धेच्या युगात आपले पाल्य अभ्यासासमवेतच इतर कलागुणांमध्येही मागे राहू नये; म्हणून पालक मुलांना अशा शिबिरांत भरती करतात. उन्हाळी सुटीमध्ये वर्षभरात होणार्या धावपळीमुळे बालमनावर येत असलेला ताण न्यून व्हावा, त्यांच्यामध्ये गुणवृद्धी होऊन त्यांचा सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास साध्य होईल, असे काही पालकांनी मुलांना द्यायला हवे. असे काय असू शकेल बरे ? सद्यःस्थितीला राष्ट्र आणि धर्म यांची ढासळलेली परिस्थिती, मुलांमध्ये असलेला राष्ट्र आणि धर्म प्रेमाचा अभाव, मानवी मूल्यांचा होत असलेला र्हास, मुलांचा आत्मकेंद्रितपणा बघता पालकांनी आपल्या मुलांना हवे तसे देण्याऐवजी काळानुसार काय देणे आवश्यक आहे ? याचा अभ्यास करायला हवा.
सध्याची मेकाॅलेप्रणित शिक्षणप्रणाली मुलांना केवळ सतत बाह्य गोष्टींच्या मागे पळणारे एक असंवेदनशील मानवी यंत्र बनवत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या हा मुले आणि पालक यांचा एकमेकांसाठी हक्काचा वेळ आहे. या वेळेत पालक आपल्या पाल्यरूपी मातीच्या गोळ्यांना आकार देण्याचे, अर्थाअर्थी घडवण्याचे महत्कार्य निश्चितच करू शकतात. पालकांनी मुलांना नैतिक मूल्ये शिकवावीत. धर्मग्रंथातील देवीदेवतांच्या कथा, संतकथा, हिंदूंची उच्च विचारसरणी, हिंदु संस्कृतीमध्ये सांगितलेल्या विविध कृतींमागील शास्त्र समजावून सांगून त्यांच्या मनावर भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्माचे मानवी जीवनातील आणि आध्यात्मिक स्तरावर भारताचे जगातील उच्चतम स्थान यांविषयीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. सांप्रतकाळी शाळेत शिकवला जाणारा उणापुरा इतिहास मुलांच्या मनात राष्ट्र-धर्माप्रती प्रेम, आदरभावना निर्माण करण्यास असमर्थ आहे. महापुरुषांच्या पराक्रमाच्या कथा, क्षात्रवृत्तीने ओतप्रोत असा जाज्वल्य इतिहास, स्वातंत्र्यसमराची उद्बोधक गाथा मुलांना सांगणे, हे पालकांचेच कर्तव्य ठरते, तरच भारतीय संस्कृती, वीरता, पुरुषार्थ, भारतियांमध्ये उपजतच असलेली शौर्यवृत्ती यांविषयीच्या जाणिवा मुलांच्या मनामध्ये निर्माण करणे शक्य होईल. सध्याच्या शिक्षणप्रणालीमुळे मुले केवळ स्वतःवर प्रेम करायला शिकत आहेत. राष्ट्र, धर्म, तसेच समाजावर प्रेम करायला आपल्यालाच आपल्या मुलांना शिकवावे लागणार आहे. शाळांमधून शिकवला जाणारा अभ्यास मुलांना परिपक्व बनवण्यासाठी उपयोगाचा नाही. त्यासाठी पालकांनीही हिंदु संस्कृती आणि अध्यात्म यांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.