स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीपत्राचीच अधिक चर्चा होणे दुर्दैवी ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यान

जळगाव – स्वातंत्र्यवीर सावरकर हे काळाच्याही पुढे होते. ते केवळ क्रांतीकारक, देशभक्त नव्हे, तर लेखक, कवी, साहित्यिक, संघटक असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. ११ वर्षे सावरकरांनी अंदमान-निकोबारच्या कोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती; मात्र त्यांच्या शिक्षेची चर्चा होण्यापेक्षा दुर्दैवाने त्यांच्या त्या कथित माफीपत्राचीच अधिक चर्चा केली जाते, असे उद्गार व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी काढले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगाव आणि सावरकर प्रेमी विविध सहयोगी संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

या वेळी मंचावर आ. राजूमामा भोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुशील अत्रे, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगावचे अध्यक्ष नितीन पारगावकर, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या वृंदा भालेराव उपस्थित होत्या. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानाला जळगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

डॉ. सच्चिदानंद शेवडे पुढे म्हणाले की,…

१. सावरकरांसारख्या अनेक थोर क्रांतीकारकांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी स्वत:चे आयुष्य झिजवले. आता त्यातून सुराज्याची निर्मिती कशी होईल ?, हे आपले पुढचे ध्येय असले पाहिजे.

२. ‘मित्रमेळा’ आणि ‘अभिनव भारत’च्या माध्यमातून युवकांचे संघटन करण्याची मोहीम सावरकरांनी चालू केली होती. जेव्हा त्यांनी विदेशी कापडांची होळी केली, तेव्हा देशातील त्या महात्म्याने सावरकरांच्या या कृत्याचा निषेध करणारे पत्र लिहिले होते.

३. सावरकरांनी देशासाठी अनंत यातना भोगल्या; मात्र त्या त्याग आणि यातनांची चर्चा होण्यापेक्षा इतर गोष्टींचीच अधिक चर्चा केली जाते. सावरकरांनी समुद्रात मारलेल्या ऐतिहासिक उडीचेही विकृत राजकारण केले जाते; मात्र त्यातील खरा अर्थ समजून घेतला जात नाही. जगात ‘सनसनाटी’ निर्माण करण्यासाठी आणि जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते.

४. चीनच्या संदर्भात सावरकरांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने १९६२ च्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. पडत्या राष्ट्राला सावरणारा कर म्हणजे ‘सावरकर’ असे सावरकरांना कुणीतरी म्हटले होते, हे त्यांच्याकडे पाहून आपल्या लक्षात येते.

या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता सुशील अत्रे यांनीही त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ‘सावरकर एक झंझावात’ कसे होते, यावर प्रकाशझोत टाकला; परंतु कवीमनाच्या आणि ‘देहाकडून देवाकडे’ जातांना मधे देश लागतो, एवढा मोठा विचार करणारे सावरकर हे झंझावात कसे असू शकतात ? हे विविध विषयांनी उदाहरण देत विषद केले.

सत्काराला उत्तर देत डॉ. भरत अमळकर यांनी सावरकरांच्या पंचसूत्रीचा त्यांच्या जीवनात कसा प्रभाव राहिला, हे सांगितले.