श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटकमधील ‘वादिराज स्वामी मठ’ आणि ‘श्री मारिकांबादेवी’ यांच्या घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !
‘सप्तर्षी जीवनाडीवाचन क्रमांक १६५ मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘नंदीहिल्स’ येथील नंदीच्या तपस्थानाचे दर्शन घेऊन दुसर्या दिवशी सकाळी, म्हणजे २४.१.२०२१ या दिवशी कर्नाटकातील सोंदा येथील ‘वादिराज मठ’ येथे दर्शन घेण्यासाठी निघालो. सोंदा हे गाव बेंगळुरूपासून ८ घंट्यांच्या अंतरावर आहे. ‘येथील वादिराजांच्या जीवसमाधी स्थानाचे दर्शन घेणे आमच्यासाठी पुष्कळ महत्त्वाचे आहे’, असे महर्षींनी आम्हाला सांगितले होते. ३०.५.२०२४ या दिवशी आपण ‘वादिराज स्वामी मठा’विषयी पाहिले. आज श्री मारिकांबादेवीच्या दर्शनाचा वृत्तांत पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/798707.html
७. श्री मारिकांबादेवीचे दर्शन !
७ अ. साधिकेच्या घरी जातांना ‘मारिकांबादेवीचे दर्शन घेऊया’, या विचाराने मंदिराकडे जाणे : ‘आम्ही कर्नाटकातील ‘सोंदा’ या गावातून निघून ‘शिरसी’ या गावी आलो. तेथे सौ. भावनाक्का या साधिका रहातात. त्यांच्या घरी आमची रहाण्याची सोय केली होती. शिरसी येथे श्री मारिकांबादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. ‘भावनाक्कांच्या घरी जातांनाच आपण देवीचे दर्शन घेऊन जाऊ’, असा विचार माझ्या मनात आला आणि आम्ही मंदिराकडे निघालो.
७ आ. देवीच्या मंदिरात साधक भेटल्याने साधकभेटीची इच्छा पूर्ण होऊन आनंद मिळणे : मंदिराकडे जातांना माझ्या मनात एकाएकी साधकांना भेटण्याचे विचार तीव्रतेने येऊ लागले. मी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) यांना म्हणाले, ‘‘दादा, महर्षींनी आपल्याला थोडा वेळ दिला आहे, तर आपण आपल्या वेळेनुसार येथील साधकांना भेटूया.’’ काही वेळातच आम्ही मारिकांबा मंदिराच्या दारात पोचलो आणि काय आश्चर्य ! आम्हाला शिमोगा येथून देवीच्या दर्शनासाठी आलेले साधक भेटले. आम्हाला पाहून त्यांनाही पुष्कळ आनंद झाला. ‘देवीने साधकांना भेटण्याची माझी इच्छा पूर्ण केली’, असे मला वाटले. आम्ही एकमेकांना भेटल्यावर आम्हाला आनंदाने देहभान विसरल्यासारखे झाले होते. त्या साधकांचीही भावजागृती होत होती. अशा प्रकारे भगवंताने मला साधकभेटीचा आनंद मिळवून दिला.
७ इ. देवीला प्रार्थना केल्यावर तिने ती लक्षपूर्वक ऐकल्याचे जाणवणे : देवी फारच सुंदर दिसत होती. मी देवीला प्रार्थना केली, ‘हे जगदंबे, येणार्या आपत्काळात तू आम्हा सर्व साधकांचे रक्षण कर.’ पुजार्यांनी आम्हाला कुंकू, केळे आणि फुलांचे गजरे, असा प्रसाद दिला. ‘देवी माझी प्रार्थना अगदी कान देऊन ऐकत आहे. तिचे लक्ष इतर कुठेच नाही’, असे मला जाणवत होते.
८. देवीचे दर्शन घेऊन साधिकेच्या घरी निवासासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती
८ अ. साधकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याची तीव्र इच्छा होणे आणि पहिल्या साधिकेकडे गेल्यावर त्यांच्या घरी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे आगमन झाले असल्याचे समजणे : देवीचे दर्शन करून आम्ही सर्व साधक सौ. भावनाक्का यांच्या घरी निवासासाठी आलो. त्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता माझ्या मनात विचार आला, ‘आपण आताच शिरसीच्या साधकांच्या घरी त्यांना भेटायला जाऊ आणि त्यांच्याकडे साखर तरी खाऊन येऊ.’ माझी ही इच्छा इतकी तीव्र होती की, आम्ही लगेच सौ. भावनाक्का आणि सौ. सुवर्णाक्का यांना घेऊन शिरसीच्या साधकांच्या घरी जाण्यास निघालो. पहिले घर सौ. सुशीलाम्मा यांचे होते. तेथे गेल्यावर मला कळले, ‘देवीने त्यांना दृष्टांत दिला आहे आणि त्यांच्या घरी साक्षात् श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे आगमन झाले आहे.’
८ आ. देवीची मूर्ती पाहिल्यावर ‘आपल्याला ही देवीच बोलावत होती’, असे वाटणे : ही मूर्ती त्यांना त्यांच्या घराचे बांधकाम करतांना भूमीत सापडली. ती पहाताक्षणी मला वाटले, ‘अरे, मला ही देवीच बोलावत होती !’ देवीचे दर्शन घेऊन मला पुष्कळ आनंद झाला.
सौ. सुशीलाम्मा यांनी देवीच्या मागे एक लादी (फरशी) ठेवली होती आणि त्या लादीलाही हार घातला होता; कारण त्या लादीवर देवीचे रेखाचित्र आपोआप उमटत आहे आणि त्यावर तिच्या वाघाचे दोन पंजेही उमटले आहेत. सौ. सुशीलाम्मा आणि त्यांचे यजमान देवीची भावपूर्ण पूजा करतात. देवीही त्यांना अनुभूती देऊन त्यांच्या घराचे रक्षण करत आहे.
८ इ. ‘साधकांच्या घरी जाऊया आणि तेथे जाऊन साखर तरी खाऊन येऊया’, असे वाटण्यामागील उमगलेले कारण ! : ‘साधकांच्या घरी जावे’, असे मला तीव्रतेने वाटत होते; कारण देवीशी माझी भेट व्हायची होती. मला भरून आले आणि वाटले, ‘भगवंता, तू आमची किती रे आठवण काढतोस !’ त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी देवीचा प्रसाद म्हणून मला पहिल्यांदा साखरच दिली. ‘साधकांच्या घरी जाऊन साखर तरी खाऊन येऊ’, अशी इच्छा मला का होत होती ?’, याचे कारण मला कळले. ती माझी नाही, तर देवीचीच इच्छा होती. देवीला साखरेच्या प्रसादातून मला तिचे वात्सल्ययुक्त प्रेम द्यायचे होते.
८ ई. सौ. सुशीलाम्मा आणि त्यांचे यजमान यांना आलेल्या अनुभूती
१. सौ. सुशीलाम्मा यांच्या यजमानांनी मला सांगितले, ‘‘पुष्कळ वेळा मला तुम्ही आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आमच्या घरी देवीच्या रूपात आलेल्या दिसता.’’
२. त्यांच्या यजमानांना सकाळी त्यांच्या बागेत भारद्वाज पक्ष्यांचे जोडपे दिसले होते. ते म्हणाले, ‘‘आज काहीतरी शुभ घडणार आहे’, हे मला सकाळीच कळले होते आणि आज तुम्ही आमच्या घरी आलात !’’
३. सौ. सुशीलाअम्मा यांनी सांगितले, ‘‘काल रात्रीच माझ्या स्वप्नात सौ. भावनाक्का आणि सौ. सुवर्णाक्का या दोघी आमच्या घरी आलेल्या दिसल्या. आता मला त्याचा उलगडा झाला. देवीने मला तुम्ही येण्याची सूचना आधीच दिली होती. देवाचे नियोजन किती सूक्ष्म असते ना !’’ तेव्हा मी देवाला म्हणाले, ‘देवा, तुझी लीला अगाध आहे. तुझी लीला तूच जाणे !’
दुसर्या दिवशी, म्हणजे २५.१.२०२१ या दिवशी आम्ही शिरसीच्या इतर साधकांना भेटून होस्पेटकडे जाण्यास निघालो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, होस्पेट, कर्नाटक. (२८.१.२०२१, सकाळी १०.४९)
(समाप्त)
|