चारधाम यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी आवश्यक ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी – यावर्षी उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या प्रारंभीच्या आठवड्यात यात्रेकरूंची अभूतपूर्व गर्दी झाली. या यात्रेला येणार्‍यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे येथील दर्शनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तराखंड शासनाने चारधाम यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी प्रक्रिया चालू केली असून ती अनिवार्य आहे.

यावर्षीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.

ज्या दिनांकासाठी भक्तांनी नोंदणी केली असेल, त्या दिवशीच चारधाम येथे दर्शनासाठी अनुमती असणार आहे. वृद्ध, तसेच वैद्यकीय उपचार चालू असलेल्या भक्तांनी यात्रा चालू करण्यापूर्वी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.

ही मार्गदर्शक तत्त्वे  https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या लिंकवर उपलब्ध आहेत.

उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिवांनी चारधाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक असल्याचे कळवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील जे भाविक चारधाम यात्रेसाठी जाणार आहेत, त्यांनी वरील लिंकवर नोंदणी करून सर्व माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले आहे.