अभ्यासूपणा आणि गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून भवितव्य उज्ज्वल करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
जिल्हा परिषद शाळेतील २३ सहस्र विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’ साठी निवड
रत्नागिरी – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ३ गुणवत्ता परीक्षेतून २३ सहस्र विद्यार्थ्यांमधून २० विद्यार्थ्यांची ‘नासा’ला जाण्यासाठी निवड करण्यात आली. आयुष्यभर हाच अभ्यासूपणा आणि गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आय.ए.एस्., आय.पी.एस्., एम्.पी.एस्.सी., डॉक्टर, इंजिनीयर बनावे. पालकांनीही ते दायित्व स्वीकारावे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह यांनी या वेळी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले,
१. चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. त्याचसमवेत चांगल्याप्रकारे मैदानात विद्यार्थ्यांनी खेळावे. मी वयाच्या २५ व्या वर्षी प्रथम विमानात बसलो. तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात. तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.
२. गूगल आणि ॲपल आस्थापनालाही तुम्ही भेट देणार आहात. तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी नासा अभ्यास सहलीविषयी सविस्तर माहिती दिली. नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या बरोबरच इस्रोलाही यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आले आहे.