आरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. विष्णु कदम यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रीती !
‘माझ्या घरातील त्रासांवर उपाय शोधत असतांना नोकरीतील सहकारी मित्रामुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव समजले. आश्चर्याची गोष्ट, म्हणजे ते एक प्रथितयश आधुनिक वैद्य असूनही साधना शिकवत असत. मी त्यांच्याकडे गेलो आणि ‘त्यांचाच कधी होऊन गेलो’, ते मलाही कळले नाही. त्यांच्या मुंबई येथील घरी अनेक साधक सेवेसाठी येत असत. या सर्व साधकांचे अल्पाहार, चहा, जेवण हे सर्व गुरुदेवांच्या घरीच होत असे. सर्व साधक तेथे कुटुंबाप्रमाणे रहात असत. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले सर्व साधकांवर मातृ-पितृवत् प्रेम करत असत. त्यांनी अनेक साधकांना घडवले. वर्ष १९९० ते १९९५ या कालावधीत मीही सेवेसाठी तिथे रहात होतो. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांची अनुभवलेली अपार प्रीती आणि मला आलेल्या अनुभूती कृतज्ञतापूर्वक त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.
१. साधना प्रारंभ करण्यापूर्वीची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्रास
१ अ. घरात शांतता आणि समाधान नसणे : मी कोकणातील एका छोट्याशा खेड्यात एका शेतकरी घराण्यात जन्मलो. आमचे घराणे मोठे होते; पण घरात पुष्कळ त्रास होता. आमच्या घरात पुष्कळ जणांचे अल्प वयात निधन झाले होते. नातेवाइकांची २ – ३ मुले जन्मतःच मृत झाली होती. घरात वाडवडिलांच्या मालमत्तेवरून वाद होते. त्यामुळे घरात शांतता आणि समाधान नव्हते. आम्हाला कुठल्याही व्यवहारात यश मिळत नव्हते.
१ आ. घरातील तणावाचे वातावरण आणि बेताची आर्थिक स्थिती यांमुळे काळजी वाटून त्याविषयी चुलत बंधू श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांच्याशी बोलणे : आमच्या कुळांनी आमच्यावर न्यायालयात दावे केले होते. आमची आर्थिक स्थिती खालावली होती. आमच्या शेतात काम करणारी गडीमाणसे काम सोडून गेली होती. त्यामुळे घरातील सर्व जण नेहमी तणावाखाली असत. घरात आपसात भांडणे होऊन वातावरणात पुष्कळ ताण जाणवत असे. या परिस्थितीमुळे ‘आमचे कसे होणार ? आम्हाला यातून कोण सोडवणार ? केवळ श्रीरामस्वरूप सद्गुरुच आमचा उद्धार करू शकतील’, असे मला नेहमी वाटत असे. माझे हे विचार मी माझे चुलत बंधू श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांना सांगत असे.
१ इ. कार्यालयीन सहकारी श्री. प्रकाश शिंदे यांच्यात चांगले पालट झाल्याचे जाणवणे आणि त्यांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगणे : ‘घरात शांतता यावी’ यासाठी आम्ही अनेक उपाय करत होतो. त्यासाठी मी आळंदीची पायी वारीही केली; पण त्याने माझे समाधान झाले नाही. मी नोकरी करत असलेल्या टपाल कार्यालयामधील (‘पोस्ट ऑफिस’मधील) माझे सहकारी मित्र श्री. प्रकाश शिंदे यांच्यामध्ये मला चांगले पालट दिसले. मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्यामध्ये मला पुष्कळ चांगले पालट दिसत आहेत. तुम्ही कुठली उपासना करता का ?’’ तेव्हा मला त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगितले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट आणि साधनेला प्रारंभ !
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलल्यावर ‘हेच आपले तारणहार आहेत’, याची जाणीव होणे आणि त्यांच्या नम्र अन् मृदू बोलण्यामुळे त्यांच्याविषयी वाटलेला आदर द्विगुणित होणे : मी प्रकाश शिंदे यांना आमच्या घरातील एकंदर परिस्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांना विनंती केली, ‘मला तुमच्या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे यायचे आहे.’ तेव्हा, म्हणजे वर्ष १९८९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक गुरुवारी जिज्ञासूंना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करत असत. गुरुवारी मी श्री. प्रकाश शिंदे यांच्यासह प.पू. गुरुदेवांकडे गेलो. त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी मला आसंदीत बसायला सांगितले. ‘एवढ्या मोठ्या विभूतीसमोर आपण कसे बसायचे ?’, या विचारामुळे मी उभाच राहिलो. त्यांनी माझे विचार ओळखले आणि मला म्हणाले, ‘‘मी डॉक्टर आहे आणि तू रुग्ण आहेस’, असे समज आणि बस.’’ मी आध्यात्मिक रुग्ण होतोच, त्यामुळे मी त्यांच्यासमोर आसंदीत बसलो. त्यांनी मला माझे नाव विचारले. मी त्यांना माझे नाव आणि आमच्या घरातील परिस्थिती थोडक्यात सांगितली. त्यांनी ते एका कागदावर लिहून घेतले आणि शांतपणे ध्यानावस्थेत गेले. दोन मिनिटांनी ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या गावाकडील घरात वास्तूदोष आहे आणि अनिष्ट शक्तींचे त्रासही आहेत; पण तुझी साधना करायची क्षमता आहे.’’ त्यांना पाहून हेच आपले तारणहार असून मी ज्यांच्या शोधात होतो, ते हेच आहेत’, याची मला मनोमन जाणीव झाली. मी त्यांना नमस्कार करायला वाकलो. ते मला म्हणाले, ‘‘नमस्कार करू नका. मी संत किंवा गुरु नाही. मी माझ्या गुरूंचा एक शिष्य आहे.’’ त्यांच्या या नम्र आणि मृदू शब्दांनी माझा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणीत झाला.
३. साधकांनी केलेल्या छोट्या सेवेचेही कौतुक करून त्यांना सेवेसाठी प्रोत्साहन देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले
गुरुदेव ‘श्री ज्ञानेश्वर मंदिर, दादर’ येथे अभ्यासवर्ग घेत असत. मी आणि श्री. प्रकाश शिंदे त्या अभ्यासवर्गांना जात होतो. आम्ही अभ्यासवर्गाचे निमंत्रण देणारे पुठ्ठयाचे फलक बनवून ते आजूबाजूच्या मंदिरांमध्ये लावण्याची सेवा करायचो आणि ते ‘फलक कुठे कुठे लावले ?’, ते गुरुदेवांना सांगायचो. तेव्हा ते आमचे कौतुक करत असत. आमच्याकडून छोटीशी चांगली कृती झाली, तरी ते आमचे कौतुक करायचे. (क्रमशः)
– श्री. विष्णु कदम (वय ६४ वर्षे), आरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (१५.२.२०२४)
परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अभ्यासवर्गांचे महत्त्व !
१. अभ्यासवर्गात बसल्यावर डोके जड होत असल्यामुळे अभ्यासवर्गाला न जाणे, तेव्हा ‘अभ्यासवर्गाच्या सत्संगानेच हा त्रास दूर होईल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : परात्पर गुरु डॉक्टर घेत असलेल्या अभ्यासवर्गात माझे डोके जड व्हायचे; म्हणून मी १ – २ अभ्यासवर्गांना गेलो नाही. तसे मी श्री. प्रकाश शिंदे यांना सांगितले. गुरुदेवांनीच श्री. प्रकाश शिंदे यांना विचारले, ‘‘विष्णु अभ्यासवर्गाला का येत नाही ?’’ मी सांगितलेले कारण श्री. प्रकाश शिंदे यांनी त्यांना सांगितल्यावर गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘अभ्यासवर्गाच्या सत्संगानेच त्याचा त्रास उणावणार आहे.’’ हे ऐकल्यावर पुढच्या अभ्यासवर्गापासून मी नियमित जाऊ लागलो. माझी आणि माझ्या साधनेची काळजी माझ्यापेक्षा गुरुदेवांनाच अधिक होती.
२. सावंतआजींनी अभ्यासवर्गाचे महत्त्व लक्षात आणून देणे : मला अभ्यासवर्गांचे मोल कळले नव्हते; पण त्याच वर्गात येणार्या सावंतआजी (पुढे त्या संत झाल्या.) मला म्हणाल्या, ‘‘अरे वेड्या, एका शास्त्रज्ञाने आमच्यासारख्या पामरांसाठी प्रत्येक रविवारी १० ते ५ एवढा वेळ द्यावा ? देवाने आमच्या उद्धारासाठी आणखी काय करायला हवे ?’’
३. सर्वांच्या जेवणाचे डबे एकत्र करून जेवतांना जणू गोपाळकाला ग्रहण करत असल्याचा आनंद अनुभवणे : अभ्यासवर्गाला येणारे काही जण जेवणाचे डबे घेऊन येत असत. त्या सर्वांच्या डब्यातील पदार्थ एकत्र करून दुपारी १ वाजता सगळ्यांना वाटले जात. तो एक प्रकारचा गोपळकालाच होत असे. तो ग्रहण करतांना सगळ्यांच्या चेहर्यांवरून आनंद ओसंडून वहात असे.
– श्री. विष्णु कदम (वय ६४ वर्षे), आरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (१५.२.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |