Eternal Civilisation Documentary : हिंदुत्वनिष्ठ ‘प्राच्यम् स्टुडिओज’चा ‘शाश्वत संस्कृती’ नावाचा माहितीपट प्रसारित !
|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – प्रसिद्ध ‘प्राच्यम् स्टुडिओज’ या हिंदुत्वनिष्ठ संस्थेने ‘शाश्वत संस्कृती’ (इटर्नल सिव्हिलायझेशन) नावाचा माहितीपट २८ मेच्या सायंकाळी प्रसारित केला. हा माहितीपट दक्षिण भारतातील प्रगल्भ ‘भारतीय ज्ञान प्रणालीं’चे (‘इंडियन नॉलेज सिस्टम्स’चे) श्रेष्ठत्व विशद करतो. अनेक संस्कृती लयाला गेल्यावरही प्राचीन हिंदु संस्कृती कशी टिकली, याचे सुरेख वर्णन आणि तेही ‘भारतीय’ पद्धतीने या माहितीपटातून करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहून कुणाही तार्किक व्यक्तीला भारतीय ज्ञानपरंपरेविषयी शब्दातीत आश्चर्य वाटेल.
या माहितीपटाविषयी बोलतांना ‘प्राच्यम्’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण चतुर्वेदी यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले की, हा माहितीपट अत्यंत प्रभावी असून त्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना भारतीय दृष्टीकोनातून जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण अर्ध्या तासाचा हा इंग्रजीतील माहितीपट ‘प्राच्यम्’ने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केला.
सौजन्य : Prachyam
माहितीपटासंदर्भात ठळक सूत्रे !
१. हा माहितीपट बनवण्यासाठी लागला १ वर्षाचा कालावधी !
२. कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत फिरून भारताच्या प्रगल्भ संस्कृतीच्या पाऊलखुणांना भेट !
३. प्रा. बी. महादेवन्, प्रा. नीलेश ओक यांच्यासारखे मान्यवर, भरतनाट्यम् नर्तक, पारंपारिक चित्रकार, ‘कलारीपायट्टू’चे अभ्यासक, प्राचीन धातूशास्त्रज्ञ, कांस्य आणि ग्रॅनाइटच्या मूर्ती घडवणारे कारागीर, आयुर्वेद तज्ञ आणि वास्तुविशारद यांची घेतली भेट !
४. भारतीय ज्ञानाचे संरक्षण आणि प्रसार समजून घेण्यासाठी नि भारताची ‘गुरु शिष्य परंपरा’ पहाण्यासाठी वैदिक शाळा अन् पाठशाळा यांना भेटी !
५. ‘सांस्कृतिक अंतर्दृष्टी’ समजून घेण्यासाठी आदि शंकराचार्य यांच्या घरी ‘चिन्मय मिशन’च्या गौरी माहुलीकर यांच्याशी केली चर्चा !
६. संस्कृतचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीत तिची भूमिका यावर भाष्य !
माहितीपटाचा गाभा !
हिंदु संस्कृतीने युगानुयुगे मानवी समाजाला सशक्त केले. प्राचीन भारतियांनी ज्ञान प्रणालींना इतक्या उच्च पातळीवर परिष्कृत केले की, ज्ञानाच्या प्रक्रियेत प्रभुत्व मिळवून ते सामाजिकदृष्ट्या लाभदायी तज्ञांची निर्मिती करू शकतील. यामुळे सहस्रावधी वर्षे ज्ञानाचे हस्तांतरण आणि संरक्षण होत राहिले. यामुळेच एक सर्वांत समृद्ध सभ्यता निर्माण झाली. यात वास्तूकला, संस्कृती, पाककृती, साहित्य आणि अर्थ आदी शास्त्रांचा समावेश असून यामुळेच भारत १८ व्या शतकापर्यंत जगातील सर्वांत श्रीमंत देश राहिला.