कलियुगातील आपत्काळ हा साधनेला पूरक काळ असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
१. आपत्काळात जगण्यासाठीची संजीवनी
‘आपत्काळात केले जाणारे ‘यज्ञयागादी विधी’ म्हणजे एकप्रकारे जगण्यासाठीची संजीवनीच आहे.
२. भगवंताशी एकरूपता येण्यासाठी नाम, ध्यानधारणा आणि नीटनेटके कर्म इत्यादी गोष्टींच्या समवेत त्याला भावाची जोड दिल्यास आपल्यातील गुणांना मोल येऊन गुणांचे समर्पण ईश्वरी चरणांशी होणे !
ईश्वराप्रती असलेल्या भावाचे रूपांतर भक्तीरसात होऊ लागले की, भगवंताशी एकरूपता येऊ लागते. भक्तीरसात न्हाऊन निघणे, म्हणजे त्या ईश्वरी तत्त्वाशी तादात्म्य पावणे होय. केवळ नाम, ध्यानधारणा आणि नीटनेटके कर्म इत्यादी करून चालत नाही, तर त्यात आपला भाव ओतला पाहिजे. ‘जेथे भाव तेथे देव’, या उक्तीप्रमाणे त्या गुणांचे सार्थक होते. भावामुळेच आपल्यातील गुणांना मोल येते. गुणांचे समर्पण ईश्वरी चरणांशी झाल्याने अहं अल्प होऊन जीवन सार्थकी लागते. ज्या कर्मात ईश्वर नाही, ते कर्म अतिशय नीटनेटके असूनही अर्थहीन ठरते.
३. कलियुगातील आपत्काळ हा साधनेसाठीचा संधीकाळ असणे
साधनेच्या संधीकाळामध्ये प्रकृतीमधून लवकर निवृत्तीकडे जाता येते. संधीकाळात ईश्वराची ऊर्जा अधिक प्रमाणात कार्यरत असते. याचा आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी अधिक लाभ करून घेता आला पाहिजे. आता कलियुगातील आपत्काळ हा साधनेसाठीचा संधीकाळ आहे; कारण काळ प्रतिकूल असल्याने थोडेसे जरी चांगले कर्म केले, तरी ईश्वराचे साहाय्य अधिक असल्याने साधनेत होणार्या प्रगतीचा वेगही अधिक असतो; म्हणून आपत्काळात निराश न होता संधीकाळ समजून दुप्पट वेगाने साधना केली पाहिजे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२०)