आरोपीच्या रक्ताचे नमुने पालटणार्या ‘ससून रुग्णालया’तील २ आधुनिक वैद्यासह ३ जण निलंबित !
पुणे येथील कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण
डॉ. अजय तावरे हेच मुख्य सूत्रधार !
पुणे – कल्याणीनगर येथे ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने (ब्लड सँपल) पालटणारे ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील आधुनिक वैद्य अजय तावरे, आधुनिक वैद्य श्रीहरि हरनोळ आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना निलंबित करण्यात आले. यांपैकी डॉ. अतुल तावरे यांच्याकडे असलेला कार्यभारही काढून घेण्यात आला आहे. अपघात प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. तावरे यांची लष्कर भागातील ‘गीता सोसायटी’मध्ये सदनिका आहे. त्या सदनिकेची पोलिसांनी झडती घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे पुरावे सापडले असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य आरोपीच्या रक्ताचे नमुने पालटण्याचा मुख्य सूत्रधार म्हणून डॉ. अजय तावरे यांचे नाव पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘पोर्चे’ गाडी चालवणार्या एका अल्पवयीन मुलाने दुचाकी गाडीला ठोकल्याने २ जण ठार झाले होते. गाडी चालवणारा अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते.
‘माझ्या मुलाला साहाय्य करा’
अपघात झाल्यानंतर मुख्य आरोपीस ‘ससून’मध्ये आणले. तेव्हा अल्पवयीन आरोपीचे पिता विशाल अग्रवाल यांनी आधुनिक वैद्य अजय तावरे यांना २ घंट्यांमध्ये १४ वेळा भ्रमणभाष केला. ‘माझ्या मुलाला साहाय्य करा’ असे सांगत अधिक पैशांचे आमीष दाखवले. त्या दोघांचे संभाषण झाल्याचे भ्रमणभाषच्या तांत्रिक विश्लेषणातून (सी.डी.आर्. अहवालातून) समोर आले आहे.
आरोपी आणि त्याचे वडील यांचे पोलिसांना असहकार्य !
अल्पवयीन आरोपीचे वडील (विशाल) आणि आजोबा (सुरेंद्रकुमार) यांनी रहात्या घरातील सी.सी.टी.व्ही. चित्रीकरणामध्ये छेडछाड करणे, चालकावर दबाव आणून गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी सांगणे, चालकाचा भ्रमणभाष बळजोरीने घेऊन लपवून ठेवणे, चालकाचे अपहरण करून डांबून ठेवणे आदी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यासंबंधी पडताळणी करतांना आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ते पोलिसांना असहकार्य करत असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांतून समोर येत आहे. आरोपींनी गाडीचालकाचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली बी.एम्.डब्ल्यू. गाडी जप्त करण्यात आली आहे.
अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले सत्य
अपघातस्थळी रिक्क्षाचालक आमिन शेख म्हणाले, ‘पोर्शे’ कार वेगात होती. त्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठी की दुचाकीवरील मुलगी (अश्विनी कोष्टा) अंदाजे १५ ते २० फूट उंच उडून खाली आली. ती जागेवरच ठार झाली. दुचाकी गाडीवरील मुलगाही (अनिश अवधिया) बाजूला उडून पडला. ‘पोर्शे’ गाडीत पुढे २ मुले बसली होती. त्यांना बाहेर काढून लोक मारहाण करत होते. तेव्हा ती मुले ‘पैसे घ्या; पण आम्हाला मारू नका. जी काही हानी झाली आहे ती भरून देतो’, असे बोलत होती.
‘विशेष अन्वेषण समिती’ची ८ घंटे चौकशी
‘ससून’मध्ये रक्ताचे नमुने पालटल्याप्रकरणी ‘विशेष अन्वेषण समिती’ने रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका आणि कर्मचारी यांची ८ घंटे चौकशी केली. समितीने अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने कुठे घेतले ? कसे घेतले ? तेथून पुढे कोणत्या घटना कशा घडल्या ? याची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
बाल न्याय मंडळाची चौकशी होणार ?
अपघातानंतर अवघ्या १५ घंट्यांमध्ये ‘बाल न्याय मंडळा’ने आरोपीच जामीन संमत केला. शिक्षा म्हणून ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितला. या शिक्षेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर ‘महिला आणि बाल न्याय मंडळा’चे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी चौकशीचे आदेश देऊन एक समिती गठीत केली आहे.
मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांची चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी भ्रमणभाषवर १० मिनिटे चर्चा केली. त्यांनी प्रकरणाचा आढावा घेतला. राज्य सरकार पूर्णपणे पोलिसांसोबत आहे. कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. जीव गेलेल्या २ मुलांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. न्यायालयामध्ये ‘खटला’ टिकेल अशा पद्धतीने अन्वेषण करा. ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम वाढवता येईल का ? याचाही विचार करा, अशा स्वरूपाच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाची पहाणी करणार असल्याचे समजते.
संपादकीय भूमिकाआरोपीला वाचवू पहाणार्या अशांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना कठोर शिक्षा होणे जनतेला अपेक्षित आहे ! |