खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट !

छत्रपती उदयनराजे भोसले व राज्यपाल रमेश बैस

सातारा – येथील भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाबळेश्वरमध्ये राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. या वेळी अनुमाने अर्धा घंटा त्यांनी राज्यातील विविध विकासांच्या सूत्रांवर चर्चा केली. यामध्ये ‘नमामी कृष्णा’, गडदुर्गांचे संवर्धन, मराठ्यांच्या राजधान्यांचा सूचीबद्ध विकास आणि छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रसिद्ध करावा आदी मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या. या वेळी राज्य सरकार सकारात्मक पावले उचलेल, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.

निवेदनात खालील सूत्रे नमूद करण्यात आली आहेत.

१. श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावते. पुढे सातारा-सांगली जिल्ह्यांतून कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथे बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुद्धीकरण करण्यासाठी ‘नमामी गंगा’ या योजनेच्या धर्तीवर ‘नमामी कृष्णा’ योजना महाराष्ट्रासह इतर राज्यांतही राबवावी.

२. ‘बौद्ध सर्किट’ किंवा ‘रामायण सर्किट’ प्रमाणे ‘शिवस्वराज्य सर्किट’ योजना मार्गी लावावी. यातून शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास अधिकाधिक वृद्धींगत करण्यासाठी, तसेच मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी राजगड, रायगड आणि सातारा यांचा समय-सूचीबद्ध विकास करण्यात यावा.

३. पानीपत ते तंजावर मधील ऐतिहासिक स्थळे आणि परिसर यांचा सुयोग्य विकास साधावा. जेणेकरून मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहास परंपरेचे अवलोकन करण्यासाठी जगभरातून इतिहासप्रेमी या ठिकाणी भेट देतील, तसेच पर्यटनालाही अधिक चालना मिळेल. प्रतापगडसह राज्यातील गडदुर्गांची संवर्धन योजना आखण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकाने पावले टाकावीत.

४. महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासासाठी उच्च स्तरीय सनियंत्रण समितीवर, संसद – विधीमंडळ प्रतिनिधींसह, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी.