युगानुसार दुष्प्रवृत्तींचे वाढते प्रमाण आणि त्यांचा बीमोड करण्याचा श्रीकृष्णाने सांगितलेला उपाय !
१. युगानुसार दुर्जनांचे प्रमाण
‘कृतयुगात सर्वच सुजन होते. कृतयुगात क्वचितच राक्षसकथा आढळते. त्रेतायुगाच्या अखेरीस रामावतार झाला. मर्यादापुरुषोत्तम श्रीराम हे जगातील सर्व आदर्श एकवटलेले एक महामानव होते; पण त्रेतायुगात एकमुखी रामाला दशमुखी रावणाशी सामना द्यावा लागला, म्हणजे सुजन-दुर्जनांचे प्रमाण एकास दहा झाले. पुढे द्वापरयुग झाले. तेव्हा ५ पांडवांचे १०० कौरव वैरी झाले, म्हणजे दुर्जनांचे प्रमाण पाचास शंभर, म्हणजेच एकाला २० झाले. आज म्हणजे कलियुगात ‘एकास शंभर असावे’, असे वाटते.
२. श्रीकृष्णाने पांडवांना दिलेला ‘खटासी असावे खट !’ उपदेशाचा मूलमंत्र
द्वापरयुगातील दुष्ट कौरवांसारख्या, कुटील कारस्थान्यांसमोर सुशील आणि सरळमार्गी पांडवांचा सामना होता. भगवान श्रीकृष्णाला त्यांना तोंड द्यायचे नव्हते, तर तोंड पांडवांना द्यायचे होते आणि श्रीकृष्ण त्यांचे गुरु होते. ‘खटासी असावे खट !’, हाच श्रीकृष्णाचा उपदेशाचा मूलमंत्र होता.
३. पुढच्या युगातील लोकांसाठी आदर्श
श्रीराम त्रेतायुगाच्या शेवटी झाला. त्यामुळे त्याचा आदर्श त्यानंतरच्या द्वापारयुगातील लोकांसाठी होता. श्रीकृष्ण द्वापारयुगाच्या शेवटी झाला; म्हणून त्याचा आदर्श कलियुगातील लोकांसाठी आहे.
४. धर्मप्रधान नेताच राष्ट्राचा सन्मार्गदर्शक होतो !
मोक्षप्रधान नेता राजकारणात व्यावहारिकतेच्या अभावी कुचकामी ठरतो. कामप्रधान नेता हा राजकारणांतील कीड आहे. अर्थप्रधान नेते हिंस्र श्वापदासारखे समाजाचे लचके तोडतात. श्रीकृष्ण चरित्रातील बाललीला ज्या ‘श्रीमद्भागवत’ या ग्रंथात आहे, तो अध्यात्माचा भक्तीप्रधान ग्रंथ आहे. त्यातील श्रीकृष्णलीला रूपकात्मक आहेत. त्यांचा अर्थ शब्दार्थापलीकडचा आहे. महाभारतातील भगवान श्रीकृष्ण राजकीय नेते आहेत. ते धर्मप्रधान राजकीय मुत्सद्दी आहेत. धर्मप्रधान नेताच राष्ट्राला सन्मार्गदर्शक होतो.
५. विश्ववंद्य ठरलेली श्रीमद्भगवद्गीता
भारतीय युद्धारंभी श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला श्रीमद्भगवद्गीतारूपी उपदेश विश्ववंद्य ठरला आहे. धर्माची अंगोपांगे, विविध योग आणि आदर्श मानवाची आदर्श आचारसंहिताच या ग्रंथांत सांगितली आहे.
राम-कृष्णाने भारतीय जीवनाला अनन्यसाधारण उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचा आदर्श सर्वांना हितावहच ठरणार आहे. कोणत्याही काळात या अलौकिक पुरुषांची चरित्रे आणि रामायण-महाभारत हे ग्रंथ कुणालाही महान बनवल्याविना रहाणार नाहीत.’
– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (मॅसॅसौगा, औटॉरयो, कॅनडा,९.९.१९८०)