Papua New Guinea Landslide : पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनामध्ये आतापर्यंत २ सहस्र जणांचा मृत्यू !
बचावकार्यासाठी आंतरराष्ट्रीय साहाय्याचे आवाहन !
पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी) – प्रशांत महासागरात बेटांचा देश असलेल्या पापुआ न्यू गिनीमधील डोंगरी भागात २५ मे या दिवशी झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक लोक गाडले गेल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पापुआ न्यू गिनी सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांना बचावकार्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून अनुमाने ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतात ही घटना घडली होती.
संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ने पापुआ न्यू गिनीमध्ये ६७० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली होती. या संस्थेच्या आकडेवारीपेक्षा सरकारची आकडेवारी जवळपास तिप्पट आहे.
भारताकडून शोक व्यक्त
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवित हानीसाठी शोक व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे की, या कठीण काळात भारत त्याच्या मित्रांसमवेत एकजुटीने उभा आहे. आम्ही पीडित आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो.
Deeply saddened by the loss of lives in Papua New Guinea following the recent landslide.
Our thoughts are with the Government and the people. India stands in solidarity with our friends at this difficult time. @TkatchenkoMP
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) May 27, 2024