Ayodhya Ram Mandir : वाढत्या उष्णतेमुळे श्री रामलल्लासाठी वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) बसवण्यात येणार !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – देशात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांवर पोचले आहे. हवामान खात्याने यापूर्वीच देशात उष्णतेची लाट येण्याची चेतावणी दिली होती. अयोध्येतील तापमान ४१ अंशांवर पोचले आहे. यामुळे येथील श्रीराममंदिरातील श्री रामलल्लासाठी आता वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) बसवण्यात येणार आहे, तसेच श्री रामलल्लाच्या वेशभूषेमध्येही पालट करण्यात आले आहेत. श्री रामलल्लाला हलके नक्षीकाम केलेले सुती कपडे घातले जात असून हलक्या दागिन्यांसह सजवले जात आहे. प्रतिदिन दही किंवा लस्सीसह हंगामी रसाळ फळे अर्पण केली जात आहेत. यामध्ये आंबा, लिची, टरबूज इत्यादींचा समावेश आहे.
स्वामी राजकुमार दास म्हणाले की, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मूर्तीत प्राण येतात. यानंतर देवालाही भूक आणि तहान लागते. देव भक्तांना वेळोवेळी स्वप्नात किंवा अन्य मार्गांनी याची जाणीव करून देत असतो; म्हणून आम्ही श्री रामलल्लाच्या प्रत्येक सुख-सुविधांची लहान मुलाप्रमाणे काळजी घेतो.