कराड येथील ६८ ॲकॅडमी विनाअनुमती !
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून गंभीर नोंद
कराड – कराड शहराजवळ असणार्या विद्यानगर परिसरात ॲकॅडमीच्या नावाखाली पालकांची लाखो रुपयांची लूट होत आहे. अनधिकृत ॲकॅडमी चालकांचा अनागोंदी कारभार समोर आल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे. तसेच या अनधिकृत ॲकॅडमींवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
विद्यानगर परिसरातील ६८ ॲकॅडमी चालकांकडे कोणतीही अधिकृत अनुमती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडेही खासगी ॲकॅडमी चालकांविषयी कोणतीही कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र अनधिकृत पावतीपुस्तके छापून ॲकॅडमीचालक पालकांकडून लाखो रुपये उकळत आहेत. कराड शहर परिसरात ८० हून अधिक अनधिकृत ॲकॅडमी चालवणारे शिक्षक आहेत, असा कयास आहे. या ॲकॅडमीत १०० हून अधिक शिक्षक इयत्ता पाचवी, आठवी, दहावी, बारावीचे वर्ग चालवत आहेत. ‘पाल्याला ॲकॅडमीत प्रवेश घ्या’, असे सांगून पालकांना स्वत:च्या जाळ्यात ओढत आहेत. १० वर्षांपासून हे चालू असून या सर्व प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत. शिक्षण विभागातील अधिकारी आणि कराड विभागातील शिक्षण संस्था यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्यानेच शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. त्यामुळे सामान्य पालकांना वेठीस धरून त्यांची आर्थिक पिळवणूक चालू आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
संपादकीय भूमिकाविनाअनुमती ६८ ॲकॅडमी उभ्या राहूनही शिक्षणाधिकार्यांना त्यांचा थांगपत्ता कसा लागत नाही ? |