स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे अल्पसंख्यांकांविषयीचे धोरण
आज ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (दिनांकानुसार)’ आहे. त्या निमित्ताने…
‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अल्पसंख्यांक धोरण’, या विषयावर दीर्घ चिंतन होणे आवश्यक आहे. उगाच कुणीही उठावे आणि कोणतीही माहिती जाणून न घेता सावरकर, त्यांचे हिंदुत्व आणि अल्पसंख्यांक धोरण यांविषयी बोलावे, इतका हा साधा सोपा विषय नाही. इंटरनेटवर माहिती शोधून, पुस्तके वाचून सावरकरांविषयी समजेल; पण ‘सावरकर’ समजतीलच, असे नाही.सावरकर ही केवळ एक व्यक्ती नसून एक प्रगल्भ विचारसरणी आहे. धर्म, शास्त्र, दूरदृष्टी, देशभक्ती आणि निःपक्षपतीपणाच्या भरभक्कम आधारावर उभी असणारी ही विचारसरणी आज स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही उपयोगी पडणारी आहे. सावरकरांना विरोध नक्की कशासाठी ? त्यांच्या हिंदुत्वासाठी ? मग विरोधकांनी हा विरोध करतांना त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या जाणून घ्यायचा साधा प्रयत्न तरी केला आहे का ? हिंदुत्व म्हणजे काय ?
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या
जसे ‘आईचे ममत्व, पित्याचे पितृत्व, कार्याचे उत्तरदायित्व, तसेच हिंदुस्थानचे हिंदुत्व !’, ही संज्ञा सर्वप्रथम बंगाली साहित्यिक चंद्रहास बसू यांनी त्यांच्या ‘हिंदुत्व’ (१८९२) या ग्रंथात वापरली होती, तसेच लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी अनुक्रमे त्यांच्या ‘केसरी’ अन् ‘सुधारक’मधील लेखात ‘हिंदुत्व’ या शब्दाचा उल्लेख केला होता; पण तरीही ‘सावरकर यांचे हिंदुत्व देशाला घातक आहे’, असे वारंवार म्हणणार्यांसाठी सावरकर यांच्या हिंदुत्वाविषयी थोडेसे लिखाण येथे देत आहे.
आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारतभूमिका ।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः ॥
अर्थ : ‘सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या विशाल भूभागाला आपली पुण्यभू समजणारे सर्व हिंदु होत.’
या व्याख्येमधील ‘पुण्यभू’ या शब्दाविषयी अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ‘हा शब्द सावरकर यांनी मुसलमानांना वगळण्यासाठी मुद्दाम लिहिला आहे’, असा अत्यंत चुकीचा समज पसरवण्यात आला आहे. मुळात हा आक्षेपच हास्यास्पद आहे. ही व्याख्या ‘हिंदु’ या शब्दाची आहे, ‘भारतीय’ या शब्दाची नाही. ‘हिंदु’ शब्दाच्या व्याख्येत फक्त हिंदूंविषयीच सांगितले जाणार, त्यामध्ये इतर धर्मियांना सामावून घेतले जाण्याचा प्रश्न येतोच कुठे ? बर ‘हिंदु’ या शब्दाच्या व्याख्येत सामावून घेतलेले इतर धर्मियांना चालेल का ? या व्याख्येनुसार ज्यांची पुण्यभूमी या देशात नाही, ते हिंदु नाहीत, इतकेच सावरकर यांना म्हणायचे आहे. याचा अर्थ मुसलमानांचे किंवा इतर धर्मियांचे नागरिकत्व नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे ? पाण्याचे रासायनिक समीकरण ‘H२O’ हा आहे. ‘H’, म्हणजे हायड्रोजन आणि ‘O’ ऑक्सिजन. आता ‘H’ म्हणजे हायड्रोजन म्हटले, म्हणजे पाण्यामधील ‘O’चे अस्तित्व नाकारले, असा अर्थ होतो का ? तसेच ‘हिंदु’ शब्दाच्या व्याख्येत फक्त हिंदूंविषयीच लिहिले आहे.
२. सावरकर यांचे हिंदुत्व
‘हिंदु’ या शब्दाच्या व्याख्येनंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘हिंदुत्व.’ ‘हिंदुत्व’ हा शब्द धार्मिक नाही, तर सामाजिक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. साध्या सोप्या शब्दांत सांगायचे, तर ‘हिंदूंच्या न्याय्य आणि नागरी अधिकारांचे संरक्षण म्हणजे हिंदुत्व.’ आता पुन्हा यावर आक्षेप नको; कारण ‘फक्त हिंदूंच्याच न्याय्य आणि नागरी अधिकारांचे संरक्षण करा’, असे सावरकर कधीही म्हणालेले नाहीत.
३. सावरकर यांची ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना
३ अ. सर्व नागरिकांना अधिकार आणि त्यांची राष्ट्राप्रती असणारी कर्तव्ये यांत समानता : सर्व नागरिकांचे अधिकार आणि त्यांची राष्ट्राप्रती असणारी कर्तव्ये समान असावीत. ती जात, धर्म, पंथ, वंश यापैकी कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसावी. या हिंदुस्थानशी नागरिकांनी पूर्णपणे एकनिष्ठ आणि कृतज्ञ रहाण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. सर्वांना समान मूलभूत अधिकार असावेत. ‘हिंदु राष्ट्रा’ची कल्पना कोणत्याही प्रकारे ‘हिंदी राष्ट्रा’शी विसंगत नाही. यामध्ये सर्वधर्मसमभाव दिसून येतो, जो आपल्या राज्यघटनेचा मूळ आधार आहे. मग या संकल्पनेत विरोधकांना नक्की गैर काय वाटते ? प्रत्येक भारतीय नागरिकांच्या न्याय्य आणि नागरी अधिकारांचे संरक्षण करणे घटनेनुसार आवश्यकच आहे.
सावरकर यांनी कधीही अल्पसंख्यांकांना असमानतेची वागणूक दिली नाही. याउलट २१ ऑक्टोबर १९३९ या दिवशी परळ (मुंबई) येथील नवरात्र उत्सवात १५०० लोकांसमोर ‘हिंदूंची सद्यःस्थिती आणि कर्तव्ये’, या िवषयावर दिलेल्या भाषणात सावरकर यांनी सांगितले होते, ‘समाजातून अस्पृश्यता नष्ट करायची आहे. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी या सर्व भारतियांना राजकीय, सामाजिक, नागरी आणि धार्मिक क्षेत्रांत समान अधिकार मिळायला हवेत, हे माझे मुख्य राजकीय उद्दिष्ट आहे.’ यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, सावरकर नेहमीच समानतेच्या बाजूने होते.
रत्नागिरीमध्ये असतांना दसर्याच्या दिवशी शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींसह सावरकर काही स्थानिक मुसलमान पुढार्यांच्या घरी सोने द्यावयास गेले होते. या मुसलमान पुढार्यांनीही त्यांचे चांगले स्वागत केले होते. त्यानंतर त्यांनी ‘ख्रिस्ती मिशन’मध्येही जाऊन तेथील ख्रिस्ती पुढार्यांनाही सोने वाटले होते.
स्वतः उच्च कुळात जन्म घेऊनही केवळ समाजहितासाठी झटणार्या सावरकर यांनी जिथे स्वतःच्या धर्मात असणारी असमानता मोडून काढण्याचा प्रयत्न केला, ते सावरकर इतर धर्मांविषयी असमानतेचा विचार करतीलच कसा ? ‘मी आधुनिक आहे, तरीही मी धर्मभेद पाळणार. माझा विरोध फक्त जातीभेदाला आहे, धर्मभेदाला नाही’, असे जर कुणी म्हणत असेल, तर ते कितपत पटेल ?
४. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हिंदूंचा बहुसंख्यांकवाद अल्पसंख्यांकांवर लादायचा होता’, या आरोपाचे खंडण
‘सावरकर हे इस्लामद्वेष्टे होते. त्यांना नेहमीच त्यांच्या हिंदु राष्ट्रात हिंदूंना उच्च, तर मुसलमानांसह इतर अल्पसंख्यांकांना दुय्यम स्थान द्यायचे होते. त्यांना हिंदूंचा बहुसंख्यांकवाद अल्पसंख्यांकांवर लादायचा होता’, अशा प्रकारचे अनेक आरोप सावरकर यांच्यावर केले जातात. हे आरोप किती बिनबुडाचे आहेत ? हे सिद्ध करणारे काही महत्त्वाचे पुरावे –
वर्ष १९३९ मध्ये सावरकर यांनी लखनौमधील (लक्ष्मणपुरी, उत्तरप्रदेश) शिया मुसलमानांना पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे ‘गोवधबंदी आणि मशिदीवरून जातांना वाद्य वाजवण्यास संमती’, या हिंदूंच्या मागण्या आपणहून मान्य करून त्यांनी दाखवलेल्या खर्या राष्ट्रीय वृत्तीविषयी त्यांचे अभिनंदन केले होते. सावरकर त्या आभारपत्रात म्हणाले होते, ‘या शिया पंथियांनी अनुसरलेल्या राष्ट्रीय वृत्तीशी सहकार्य देण्यास हिंदू सभा संपूर्णत: सिद्ध आहे; नव्हे, अशा राष्ट्रीय आणि न्यायप्रिय बंधूंशी सख्यत्व ठेवण्याची तिची तीव्र इच्छा आहे. अशा प्रकारे समान एकीची भूमिका स्वीकारण्यास जेव्हा बाकीचे हिंदु सोडून इतर सिद्ध होतील, त्याच वेळी हिंदु राष्ट्रात हिंदू-अहिंदूंची राष्ट्रीय एकी निर्माण होईल.’ (संदर्भ : दैनिक ‘केसरी’, १ ऑगस्ट १९३९) इथे सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे सावरकर यांनी शिया मुसलमानांचा उल्लेख ‘राष्ट्रीय वृत्ती, राष्ट्रीय आणि न्यायप्रिय बंधू’, असा केला आहे.
सावरकर यांनी मुसलमानांच्या ‘न्याय्य अधिकार आणि मागण्या’ यांना कधीही विरोध केला नाही. उलट ‘त्या मान्य केल्या जातील’, असे ते स्पष्टपणे नमूद करतात. ‘जगा आणि जगू द्या’, या आदर्श विचारसरणीचे अनुसरण करणे चूक आहे का ? आपले न्याय्य अधिकार आणि हक्क जपतांना इतरांच्या न्याय्य अधिकारांना डावलणे त्यांना कदापि मान्य नव्हते. त्यांचे अधिकार हिरावून घेणे त्यांना मान्य नव्हते.
मुस्लीम लीग आणि बॅरिस्टर जिना यांनी ५० टक्के राजकीय जागांची मागणी केली, तर काँग्रेसने त्यांना ३० टक्के ते ४० टक्के जागा द्यायची सिद्धता दर्शवली. दोघांमध्ये वाद फक्त १० ते २० टक्के जागांसाठी होता; परंतु २० टक्के अल्पसंख्यांकांना ४० टक्के जागा, म्हणजे ८० टक्के हिंदूंवर अन्याय नाही का ? त्या वेळी समान अधिकारांची विचारसरणी असणार्या सावरकर यांनी आवाज उठवला. त्यावेळी सावरकर म्हणाले होते, ‘कोणताही धर्म ठेवू नका. त्यास माझी ना नाही; पण हिंदु धर्मावर सतत होणारे अन्याय मला मान्य नाही. मला मुसलमानांची भीती वाटत नाही. मला इंग्रजांचीही भीती वाटत नाही. मला भीती वाटते ती हिंदूंमधील न्यूनगंडाची ! तो आपण काढायला हवा.’
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समान अधिकारांविषयी…
‘तुमची ही भीती आज खरी ठरली आहे सावरकर ! कशासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या तुम्ही ? अंदमानात हालअपेष्टा सोसून काय मिळाले तुम्हाला ? ज्या एकात्मतेसाठी तुम्ही लढला, त्याच एकात्मतेच्या तुम्ही विरोधात होता’, असा चुकीचा समज आज पसरवला जात आहे. ज्या समाजाच्या हितासाठी तुम्ही आयुष्यभर राबला, त्याच समाजाने तुमच्या आदर्श विचारसरणीची खिल्ली उडवण्याचा नवा खेळ चालू केला आहे.
सावरकर यांच्या कोणत्याही धोरणाविषयी लिहायचे म्हटले, तर त्यांच्या प्रत्येक धोरणावर एक कादंबरी लिहून होईल. क्रांतीकारक रासबिहारी बोस यांनी मार्च आणि एप्रिल १९३९ मध्ये ‘दाई आजिया शुगी’ या जपानी मासिकात ‘सावरकर : नव्या भारताचा उगवता नेता – कर्तृत्व आणि व्यक्तीमत्त्व !’, या शीर्षकाखाली सावरकर यांच्या चरित्रावर लिहिलेल्या लेखाचा २ वाक्यात लिहिलेला निष्कर्ष सावरकरांविषयी पुष्कळ काही सांगून जातो. त्यांनी लिहिले आहे, ‘तुम्ही सावरकर यांच्या विचारांशी सहमत झाला, तरच तुम्ही राजकीय दृष्टीने सामर्थ्यशाली बनाल. सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्थान अढळ आहे.’
जर समान अधिकारांचा विचार करणे, हे न्यायसंगत नसेल, तर तुम्ही चुकला सावरकर ! कारण तुम्ही (स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी) नेहमीच समानतेचा विचार केला. समाजामध्ये तेढ निर्माण करून, जातीयवाद पसरवून राजकारण करून स्वतःचा स्वार्थ साधणे, हेच समाजहिताचे असेल, तर तुम्ही चुकला सावरकर ! कारण तुम्ही या सार्याला नेहमीच विरोध केला. या समाजाला जिथे सावरकरच समजले नाहीत तिथे त्यांची दूरदृष्टी काय कळणार ? (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’, लेखक : श्री. अक्षय जोग, मृत्यूंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)
– मानसी जोशी
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)
संपादकीय भूमिकाज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत, त्यांनी त्यांच्या धोरणांविषयी बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणे होय ! |